06 August 2020

News Flash

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनामुळे निधन

नीला सत्यनारायण यांचं निधन

संग्रहित

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.

नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले. याशिवाय त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं. नीला सत्यनारायण यांनी एकदा आपला अनुभव सांगताना, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएएस होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएएस झाले,” असं सांगितलं होतं.

नीला सत्यनारायण यांची पुस्तके
आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
आयुष्य जगताना
एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
एक पूर्ण – अपूर्ण (आत्मचरित्रपर)
ओळखीची वाट (कवितासंग्रह)
जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव)
टाकीचे घाव
डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
तिढा (कादंबरी)
तुझ्याविना (कादंबरी)
पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
मैत्र (ललित लेख)
रात्र वणव्याची (कादंबरी)
सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:33 am

Web Title: former state election commissioner neela satynarayana dies due to corona sgy 87
Next Stories
1 नाल्यात पडल्यास जबाबदार नाही!
2 पालिकेला मिळालेले ४०० व्हेंटिलेटर धूळखात
3 झोपु प्राधिकरण झोपडय़ाही पाडणार
Just Now!
X