बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जॉर्ज फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रत्येकाला आकर्षण होते. त्यांच्या पिढीतील शेवटचा नेता गेला, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर दिली. फर्नांडिस यांच्यासारखा बेडर आणि लढवय्या नेता अजून पाहिला नाही, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले. जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ८८ व्या वर्षीत दिल्लीत निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

फर्नांडिस हे कामगारांसाठी रस्त्यावर बेडरपणे उतरत. त्यांनी कधीच कायदा, पोलीस किंवा सरकारची भीती बाळगली नाही. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, अनेकवेळा त्यांना दुखापत ही झाली. पण त्यांनी नेहमी कामगारांचा, कष्टकऱ्यांचाच विचार केला.

ते अत्यंत साधे व्यक्ती होते. त्यांना अनेक भाषा येत. त्यांची मराठी ही अत्यंत उत्तम होती. ते कामगारांशी, कार्यकर्त्यांशी मराठीतूनच संवाद साधत, असे ते म्हणाले. यावेळी राऊत यांनी जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मैत्रीचे किस्सेही सांगितले.

एकमेकांवर टीका करत असले तरी बाळासाहेब आणि फर्नांडिस यांच्यात मैत्री होती. त्यांच्यात भावनिक नाते होते. बाळासाहेबांच्या घरात ते मुक्काम करायचे. ज्यावेळी बाळासाहेब घरात नसत त्यावेळी ते घरी जाऊन मीनाताई ठाकरेंना हक्काने जेवायला मागायचे, असे ते कलंदर नेते होते.

ते देशाचे पहिले संरक्षण मंत्री होते जे देशाच्या विविधी भागात असलेल्या छोट्याछोट्या चौकीत जात. ते दिल्लीत कधीच लष्करी मुख्यालयात थांबले नाहीत. त्यांच्यावर काँग्रेसने जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले तेव्हा जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

आणीबाणीमध्ये अनेक नेते तुरूंगात होते. पण फर्नांडिस हे भूमिगत झाले होते. भूमिगत राहून त्यांनी इंदिरा गांधी सरकार उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्राबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी सातत्याने मराठी माणसाची बाजू घेतली, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.