एकेकाळी एका कंपनीचा उपाध्यक्ष असलेल्या वाशी येथील एका व्यक्तीला कार जॅकिंग (चोरी), चेन स्नॅचिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुमित सेनगुप्ता (वय ३५) असे या आरोपीचे नाव असून कौटुंबिक कारणामुळे त्याने महिना अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती, असे समोर आले आहे.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. तपास अधिकारी विकास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये सुमितच्या पत्नीने त्याच्याविरोधात वाशी पोलिसांत छळाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो त्रस्त होता. नोकरी नसल्यामुळे उंची जीवनशैली जगणारा सुमित पैशांअभावी त्रस्त झाला होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन लागले.

सुमितने एका मोठ्या शैक्षणिक संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. तपास अधिकारी गायकवाड पुढे म्हणाले, आम्ही १२ डिसेंबरला वाशीत महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सेनगुप्ता आणि त्याचा सहकारी नितीन अग्रवाल (वय २५) याला अटक केली होती. जेव्हा त्यांनी चेन चोरली तेव्हाही ते चोरीच्या कारमध्ये होते.

९ डिसेंबरला वाशीतील फोर्टिस रुग्णालयाबाहेर वाहन चालकाला मारहाण करुन सुमितने गुन्ह्यासाठी वापरलेली कार पळवली होती. वास्तविक त्याच्याकडे बंदूक नव्हती. परंतु, चालकाला घाबरवण्यासाठी त्याने त्याच्या डोक्याला लोखंडाची बंदुकीसारखी वस्तू लावली होती. कार चोरल्यानंतर ३ दिवसानंतर त्याने चेन स्नॅचिंग केले होते.

२०१७ मध्ये वाशी पोलिसांत त्याच्याविरोधात आणखी एका चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात आणखी दुसऱ्या कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे की, याची माहिती घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.