छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. त्या ठिकाणी जो ढिगारा झाला त्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत सहाजणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत चारजण ठार झाले आहेत तर १७ जण जखमी झाले आहेत. काही वेळापूर्वीच एका जिवंत माणसाला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खासदार अरविंद सावंत या ठिकाणी दाखल झाले. पोलीस आयुक्त आणि इतर मंडळीही घटनास्थळी दाखल झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी नेमकं काय काय घडलं त्याची माहिती घेतली. पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महापालिका आयुक्त इक्बाल चहेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी भानुशाली इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की क्रेनच्या सहाय्याने आत्तापर्यंत १२ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यापैकी चारजण जखमी आहेत. तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.