मुंबईतील फोर्ट येथील अजा तेजलिंग लामा (वय ८६) यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. लामा यांची त्यांच्या नातवाने साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. संपत्तीवर डोळा आणि आईवर लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकल्याने लामा यांची हत्या करण्यात आली.

फोर्ट येथील शहीद भगत सिंग मार्गावरील संत निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लामा एकटेच राहायचे. त्यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. माता रमाबाई मार्ग पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपासानंतर पोलिसांनी डोंबिवलीतील दोरजे (वय २९) याला अटक केली आहे. दोरजे हा लामा यांचा नातू असून काही वर्षांपूर्वी दोरजे, दोन भाऊ आणि आईसह डोंबिवलीत राहायला गेला होता. डोंबिवलीत त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता.

दोरजेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आजोबा लामा यांनी त्याच्या आईवर लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकला होता. याचा बदला त्याला घ्यायचा होता. तसेच त्याचा आजोबांच्या संपत्तीवरही डोळा होता. लामा यांचे फोर्ट, कांदिवली परिसरात घर आणि गाळे होते.

‘याप्रकरणी दोरजे कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी लामा यांच्या विरोधात डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. हे प्रकरण खूप जुने आहे. आम्ही दोरजेचा दाव्यात किती तथ्य आहे याचा तपास करत आहोत’, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

दोरजेला लामा यांचा दिनक्रम माहित होता. त्याने चार मित्रांना आजोबांच्या हत्येची सुपारी दिली. सोमवारी रात्री उत्कर्ष उर्फ कृष्णा सोनी ( वय २०), जयेश उर्फ फॅन्ट्री कनोजिया ( वय २०), एंजल डॅनियल भिसे (वय २५) आणि आनंद दिलीप राय उर्फ कालिया (वय २२) हे चौघे लामा यांच्या घरी गेले. लामा यांनी दरवाजा उघडताच सोनीने तीक्ष्ण हत्याराने लामा यांच्यावर वर केले. यात लामा यांचा मृत्यू झाला.

तपासात पोलिसांना दोरजेवर संशय आला. एका खबरीने दोरजेबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत दोरजेने गुन्ह्याची कबुली देतानाच हत्येची सुपारी घेणाऱ्या मित्रांची नावेही उघड केली. यानंतर पोलिसांनी त्या चौघांनाही अटक केली. न्यायालयाने पाचही आरोपींची पोलीस कोठडी सुनावली आहे.