‘मरिन लाइफ’ मोहिमेअंतर्गत ११ प्रजातींचा उलगडा

‘मरीन लाइफ ऑफ मुंबई’ या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईच्या सागरी परिसंस्थेत अस्तिवात असणाऱ्या ‘सी स्लग’ (समुद्री गोगलगाय) या जीवाच्या प्रजातींचा नव्याने उलगडा होत आहे. मुंबईच्या सागरी परिसंस्थेची जैवविविधता हा दुर्लक्षित विषय आहे. त्यामुळे या संदर्भात संशोधन करून त्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी गतवर्षी ‘मरीन लाइफ ऑफ मुंबई’ मोहीम सुरू झाली. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या विविध किनाऱ्यांवर समुद्री गोगलगायींच्या प्रजातींमधील ११ प्रजाती दृष्टिक्षेपात आल्या आहेत. त्यातील काही प्रजाती मुंबईच्या सागरी परिसंस्थेत प्रथमच निरीक्षणात आल्याची किंवा भारतासाठी त्या नवीन असण्याची शक्यता आहे.

मुंबईसभोवती पसरलेल्या सागरी परिसंस्थेची जैवविविधता संशोधण्यासाठी आणि जनसामान्यांमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या मोहिमेची फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरुवात झाली. या माहिमेद्वारे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सागरी जिवांच्या निरीक्षणाचे काम चालते. सोबतच किनारा फेरींचे आयोजन करून ही माहिती मुंबईकरांना दिली जाते. गेल्या चार महिन्यांपासून समुद्र गोगलगायींच्या दुर्मीळ प्रजाती या मोहिमेतील निरीक्षकांना दिसत आहेत. समुद्र गोगलगायींच्या प्रजातींचा आकार सुमारे ४ मि.मी. ते काही इंचापर्यंत असू शकतो. मुदू शरीर, विविध आकर्षक रंग आणि शोभिवंत दिसण्यामुळे त्यांना ओळखता येते. खडकाळ किनाऱ्यांवर उथळ पाण्यात या प्रजाती आढळून येतात.

नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी समुद्री शैवाळ, स्पॉज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समद्री गोगलगाय उपजीविकेसाठी येतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम असतो. ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ मोहिमेतील निरीक्षकांना समुद्री गोगलगायींच्या ११ प्रजाती मरिन ड्राइव्ह, कार्टर रोड, खार दांडा, हाजी अली, जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्यांवर आढळून आल्या आहेत. यामध्ये स्मार्गडीनेला (७ मि.मी.), एलिसिया (४ मि.मी), प्लोकॅमोफेरस (२ इंच), सेबाडोरिस ( ६ इंच), होपलोडोरिस (२ इंच), डेन्ड्रोडोरिस (४ इंच), बोर्नेला (२ इंच), मॅरिओनिआ (२ इंच), क्रेटेना (१ इंच), हॅमिनोईया (४ मि.मी) आणि अ‍ॅक्टोनोसायक्लस (२ इंच) या प्रजातींचा समावेश आहे.

यामधील ‘क्रे टेना’ आणि ‘अ‍ॅक्टिनोसायक्लस’ या प्रजातींविषयी अजूनही निरीक्षक आणि तज्ज्ञ अभ्यासक संभ्रमावस्थेत आहेत. ‘क्रेटेना’ या नव्या प्रजातीची संशोधन पत्रिका सद्य:स्थितीत अभ्यासात आहे. तर ‘अ‍ॅक्टिनोसायक्लस’ ही प्रजात डॉ. दीपक आपटे या तज्ज्ञ संशोधकांकडे अभ्यासण्यासाठी दिली असल्याची माहिती सागरी परिसंस्थेचे अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी दिली. तसेच ही प्रजात पहिल्यांदाच आढळून आल्याने भारतासाठी ती नवीन असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. सागरी परिसंस्थेतील निरनिराळ्या प्रजातींविषयी भारतात गेल्या काही दशकांपासून संशोधनाचे काम झालेले नाही. त्यातही मुंबईच्या सागरी परिक्षेत्रात आढळणाऱ्या जीवांविषयी ब्रिटिश कालावधीनंतर मुळातच संशोधन झालेले नाही. त्यामुळे समुद्र गोगलगायींच्या दृष्टीने नवीन प्रजाती सापडण्याची शक्यता नाकारता येत नसून मुंबईच्या सागरी परिसंस्थेचे संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत ‘बीएनएचएस’चे संचालक आणि सागरी परिसंस्थेचे ज्येष्ठ संशोधक डॉ. दीपक आपटे यांनी मांडले आहे. तसेच किनारा निरीक्षणाच्या मोहिमेमुळे सागरी जीवांच्या विविध प्रजाती प्रत्यक्षात अभ्यासण्यासाठी मदत होत असल्याचे रुईया महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयाचा विद्यार्थी विघ्नेश समेळ याने सांगितले.