प्रख्यात चित्रकार-शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भंबानी यांच्या दुहेरी हत्याकांडात वापरली गेलेली गाडी पोलिसांना सापडली असून हेमा उपाध्याय यांच्या कानातील रिंगाही आढळल्या आहेत. ही माहिती पोलिसांनी बोरिवली महानगरदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अटक आरोपींची कोठडी वाढवून मागताना दिली आहे. त्यामुळे खुनाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ात चोरीचे कलमही नमूद केले आहे.
कांदिवली येथील नाल्यात मृतदेह टाकण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच भंबानी यांची गाडी ताब्यात घेऊन त्याची न्यायवैद्यक तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जात आहे. हेमा पती चिंतन याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. परंतु या हत्याकांडाशी संबंधित पुरावे पोलिसांना आढळलेले नाही. या हत्याकांडातील मूख्य सूत्रधार विद्याधर याच्याशी चिंतनचे काही वेळा बोलणे झाल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय चिंतनच्या अन्य मोबाईल क्रमांकाचीही माहिती मिळविली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.