महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली असली तरी शिवसेनेवर बाजी मारत भांडूप येथे थीम पार्क उभारण्याची योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्षात आणण्यास सज्ज झाली आहे. शनिवारी राज ठाकरे यांच्या हस्ते या थीमपार्कचे भूमिपूजन  होणार आहे.
यापूर्वी ‘वाय फाय’ सेवा देण्यावरून सेना-मनसेत शिवाजी पार्क येथे जुंपली होती. त्यावेळीही मनसेनेच सर्वप्रथम पाल्र्यात ‘वाय फाय’ सुरू करून सेनेवर मात केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर थीम पार्कच्या भूमिपूजनाचा घाट घालत मनसेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
भांडूप येथील पूर्व द्रुतगती मार्गालगत भांडूपेश्वर कुंड येथे ‘माझे जग’ नावाचे थीम पार्क मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या प्रयत्नातून उभे राहणार आहे. २५९० चौरस मीटर क्षेत्रात सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून हे पार्क उभे राहणार असून मुंबईतील हे पहिले थीम पार्क असेल, असे आमदार सांगळे यांनी पालिका मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत सांगितले.
शासनाच्या जागेवर उभे राहणारे हे पार्क हे ‘पर्यटन स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले असून याची देखभाल शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून अबाल-वृद्धांना वेगळ्या आनंदमयी दुनियेत घेऊन जाणारे ‘जग’ असेल, असा दावा सांगळे यांनी केला.
वर्षभरात हे उद्यान उभे राहणार असून महापालिका शाळांतील मुलांना याचा मोफत वापर करू द्यावा, अशी आपली मागणी असल्याचेही ते म्हणाले.गेली २० वर्षे पालिकेत सेनेची सत्ता असूनही त्यांना असे थीम पार्क का उभारता आले नाही, असे विचारता याचे उत्तर सेनेचेच नेते देऊ शकतील, असे सांगळे म्हणाले. रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्यासाठी शिवसेनेने गेल्या वर्षभरात अनेक प्रयत्न केले. मात्र शासनाकडून त्यांना जागा उपलब्ध झाली नाही. या पाश्र्वभूमीवर मनसेने थीम पार्कचे भूमिपूजन आयोजित करून सेनेवर बाजी मारल्याची चर्चा पालिका सुरू आहे.