संदीप आचार्य 

मुंबई: मुंबईतील करोनाच्या लढाईत मुंबई महापालिकेकडून आता चार महिला सनदी अधिकारी उतरल्या असून या चौघा रणरागिणींसह एकूण सहा सनदी अधिकारी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. काल नव्याने कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांची नियुक्ती करण्यात आल्याने या लढाईत चार रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, मनिषा म्हैसकर, रामास्वामी हे कालपर्यंत मुंबईतील करोनाचा मुकाबला करत होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोजच्या रोज राज्याबरेबरच मुंबईतील करोनास्थितीसह वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती घेत असून करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात नव्याने तयार करण्यात येत असलेली व्यवस्था गतिमान करण्यासाठी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुंबईतील स्थलांतरितांना वेळच्या वेळी भोजन मिळावे तसेच त्यांचे अन्य प्रश्न सोडविण्याबरोबरच रुग्णालयांसाठी स्वयंसेवक तयार करण्याची जबाबदारी सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मनिषा म्हैसकर या यापूर्वी राजशिष्टाचार विभागात काम पाहात होत्या. त्यांनी पूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आरोग्य ही जबाबदारी पार पाडली होती. त्यांचा तो अनुभव लक्षात घेऊन करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी अतिरिक्त खाटा नायर तसेच अन्य रुग्णालयात उभारण्याच्या कामाला गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.मुंबई मेट्रोच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्याचे काम अश्विनी भिडे यांनी केले होते. तथापि राज्यात नवे सरकार येताच त्यांची मेट्रो मधून उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र आता त्यांची मुंबई महापालिकेत बदली करण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण कक्षची व अन्य काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. रामास्वामी हे सेव्हन हिलची जबाबदारी पाहात असून अतिरिक्त आयुक्त आरोग्य म्हणून सुरेश काकाणी हे काम पाहात आहेत.

एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत आहेत दुसरीकडे हॉटस्पॉटची संख्या वाढते आहे. बंद असलेली नर्सिंग होम्स, स्थलांतरित मजुरांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था, रुग्णालयातील खाटा वाढवण्यापासून ते अनेक प्रकारच्या आघाड्यांवर मुंबई महापालिकेचा सामना सुरू आहे. आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सहा सनदी अधिकारी ही लढाई लढत आहेत.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आता ४२३२ वर गेली आहे तर १६७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकट्या वरळीत ५०० तर धारावीत २२५ रुग्ण आढळले असून मुंबईतील झोपडपट्टी भागात व उपनगरात वाढणाऱ्या करोना रुग्णांबाबत मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकानेही चिंता व्यक्त केली.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “विलगीकरणासाठी आवश्यकतेनुसार शाळा, लग्नाचे हॉल तसेच मोठी प्रदर्शने भरवली जातात त्या जागा ताब्यात घेण्यात येतील. उद्यापासून आपण विभागा विभागात जाऊन तयारीची पाहाणी करणार आहे. मनीषा म्हैसकर यांच्याकडे रुग्णालय व्यवस्थापनाची जबाबदारी असून नायर रुग्णालयातील करोना रुग्णांसाठी खाटा वाढविण्याचे काम सध्या त्या पाहात आहेत. मुंबईतील स्थलांतरितांच्या जेवणाची व्यवस्था हे आता मोठे आव्हान बनले आहे.” “सहा लाख जेवणाची व्यवस्था वेळच्यावेळी करण्याची तसेच रुग्णालयांना लागणार्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आली आहे,” असे प्राजक्ता लवंगारे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या करोना लढाईत सुजाता सौनिक, मनिषा म्हैसकर, अश्विनी भिडे, प्राजक्ता लवंगारे या चार रणरागिणी उतरल्याने या लढाईचे चित्र नक्की बदलेल असा विश्वास पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.