देशभरात सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला; ‘अ‍ॅनारॉक’चा अहवाल

मुंबई, ठाणे तसेच मुंबई प्रादेशिक परिसरातील सुमारे साडेचार लाख घरांची जोमाने सुरू असलेली कामे २२ मार्चनंतर थांबली आहेत. १४ एप्रिलपर्यंत ही कामे सुरू होण्यास अडथळे असले तरी ती भविष्यात तातडीने सुरू होण्याची शक्यता नसल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केल्यानंतर ही सर्व कामे बंद झाल्याचे ‘अ‍ॅनारॉक’ या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे.

टाळेबंदीनंतर सर्वच बांधकामे तात्काळ थांबली आहेत. टाळेबंदी उठविली गेली तरी लगेच कामे सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे निश्चित मोठा फटका बांधकाम उद्योगाला बसणार आहे. तो काळ किती असेल हे सांगता येणार नाही, याकडे ‘अ‍ॅनारॉक’ प्रॉपर्टी कन्सल्टंटचे संचालक व प्रमुख (संशोधन) प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. याचा निश्चितच विकासकांच्या आर्थिक क्षमतेवर मोठा परिणाम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील सात प्रमुख शहरांमध्ये १५.६२ लाख घरे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. २०१३ पासून ही कामे सुरू होती. यापैकी ५७ टक्के म्हणजेच ८.९० लाख घरे मुंबई प्रादेशिक परिसर व राष्ट्रीय राजधानी परिसरात आहेत. मुंबई प्रादेशिक परिसरात ४.६५ घरे अर्धवट अवस्थेत आहेत. पुण्यात ही संख्या २.६२ लाख आहे, असेही ठाकूर यांनी निदर्शनास आणले. यंदा जानेवारी ते १५ मार्च २०२० पर्यंत नऊ हजार ३०० घरांच्या विक्रीची नोंदणी झाली. हीच संख्या गेल्या वर्षी १२ हजार ८०० इतकी होती. यंदा घरांच्या विक्रीत ३१ मार्चपर्यंत वाढ होण्याची शक्यता होती. परंतु ती आता मावळली आहे. त्यामुळे या उद्योगाला मोठा फटका सहन करावा लागणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सारीच अनिश्चितता..

संपूर्ण देशातील बांधकाम उद्योग थंडावला असला तरी त्याचा सर्वाधिक फटका मुंबई प्रादेशिक परिसर, तसेच पुण्याला बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशभरात सुरू असलेल्या एकूण बांधकामापैकी ३० टक्के बांधकामे या परिसरात आहेत. मंदीतून बाहेर पडणाऱ्या बांधकाम उद्योगाने आपले अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला होता. त्यामुळे मुंबई प्रादेशिक परिसरात साडचार लाख घरे तयार होण्याच्या मार्गावर होती. ही घरे अगोदरच ग्राहकांनी आरक्षित केलेली आहेत. आता मात्र त्यांना मिळणाऱ्या ताबा तारखेमध्ये विलंब लागणार आहे. टाळेबंदीचा कार्यकाळ आणि त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हायला किती काळ लागेल, याबाबत अनिश्चितता असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.