मुंबई लोकलच्या हार्बर मार्गवर धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या चार टवाळखोर तरुणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. काल मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या चार टवाळखोर तरुणांना ताब्यात घेतलं.

रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला होता. धावत्या लोकलमधून या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. यामध्ये चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत होता. तर इतर मुलं दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे व्हिडीओत दिसत होतं. स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, जर कोणास ही मुलं दिसली तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.
अशा हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा प्रवाशी संघटनांकडून होते. मात्र पोलिस, जीआरपीएफचे जवान अनेक स्थानकात असले तरी अशाप्रकारच्या स्टंटबाजीला लगाम लागताना दिसत नाहीय. अशाप्रकारे स्टंटबाजी करुन हे लोक स्वत:चा जीव तर धोक्यात घालतातच पण इतर सहप्रवाशांचाही जीव धोक्यात घालतात.

अशा हुल्लडबाजीमुळे आठवड्याभरापूर्वी ट्रॅकमॅनचा गेला जीव –

काही दिवसापुर्वीच अशाच एका हुल्लडबाज प्रवाशाने महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनच्या दारातून लाथ मारल्याने श्रावण सानप या ट्रॅकमनचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारची हुल्लडबाजी कमी अधिक प्रमाणात रेल्वेच्या सर्वच उपनगरीय मार्गांवर होते मात्र हार्बर मार्गावर अशा घटनांचे प्रमाण आधिक आहे.