मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवर गेल्या बुधवारी रंगलेला ‘आगीनगाडी’चा खेळ रविवारी दुपारी पुन्हा एकदा रंगला. सेवाग्राम एक्स्प्रेसच्या चार डब्यांमधील शौचकूपांमधून धूर येण्यास सुरुवात झाली. सुदैवाने ही गाडी फलाटावरच उभी असताना हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मध्य रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या अपघातस्थळी गेले असल्याने या आगीची ‘धग’ रेल्वे मुख्यालयात फारशी जाणवली नाही. मात्र या निमित्ताने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
डेक्कन क्वीन, सह्याद्री एक्सप्रेस आणि हावडा मेल या गाडय़ांमधील तीन डब्यांत बुधवारी एका तासाच्या काळात आगी लागल्या होत्या. रविवारी  दुपारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रवाना होण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडीच्या चार डब्यांतील शौचकूपांमधून धूर यायला लागला. या चारपैकी तीन डबे शयनयान श्रेणीचे, तर एक डबा साधारण श्रेणीचा होता. या आगीवर नियंत्रण मिळवल्यावर गाडी दोन तास उशिराने रवाना करण्यात आली.
शौचकूपांतील टय़ूबलाइटच्या अ‍ॅक्रलिक आवरणावर कोणीतरी लायटर धरून ते जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आम्ही पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासणार आहोत. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून ही अ‍ॅक्रलिकची आवरणे काढून टाकण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहेत, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. मात्र अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल नेमके काय करणार, याबाबत ते काहीच म्हणाले नाहीत.

प्रवाशांसह ज्वलनशील किंवा ज्वालाग्राही पदार्थ रेल्वेमध्ये जाणार नाहीत, यासाठीही विशेष तपासणी करण्यास सुरुवात झाली होती. मात्र तरीही या सर्वावर कडी करून मध्य रेल्वेत हे प्रकार घडत असल्याने त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.