मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या एकूण तीन हजार ५२० रुग्णशय्या क्षमता असलेल्या करोना आरोग्य केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुलुंड येथील लालबहादूर शास्त्री मार्गालगत एक हजार ७०० रुग्णशय्यांचे समर्पित करोना आरोग्य केंद्र सिडकोच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील ५०० रुग्णशय्या ठाणे पालिकेसाठी आरक्षित आहेत. मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर पूर्व येथे ९०० रुग्णशय्यांचे समर्पित करोना आरोग्य उभारण्यात आले आहे. तर दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात उभारलेल्या समर्पित करोना रुग्णालयात १८० अतिदक्षता उपचार सुविधांसह रुग्णशय्या उपलब्ध आहेत. महालक्ष्मी रेसकोर्स येथे ७०० रुग्णशय्यांचे समर्पित करोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे दुसऱ्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुलात उभारलेल्या समर्पित करोना आरोग्य केंद्रात ११२ रुग्णशय्या अतिदक्षता उपचारासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.