गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी विसर्जनाच्या निमित्ताने तीन दिवस मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत डीजेसह इतर कर्णकर्कश्श वाद्यांचा आवाज सहन करावा लागणार आहे. ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी दिली असली तरी ध्वनी प्रदूषण आणि परिसरातील रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
गणेश विसर्जनासाठी पाचव्या, सातव्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सह्य़ाद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या बैठकीत दिली. त्यामुळे गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्रीपर्यंत डीजे इतर वाद्यांचा दणदणाट सुरू राहणार आहे. ध्वनी प्रदूषण होत असल्यामुळे अनेक र्निबध घालण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाचा वापर न करता पारंपरिक वाद्ये वाजविली तरी नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे या संदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी समन्वय समितीकडून बैठकीत करण्यात आली. ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

सरकारने चार दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांना त्रास होणार नाही आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
  – अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष,
  बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती