मराठी प्रकाशक परिषद व प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ४ ते रविवार, ७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत गोरेगाव येथे ‘चार दिवस पुस्तकांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
अ. भि. गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव (पश्चिम) येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनात महाराष्ट्रातील साठ नामवंत प्रकाशक सहभागी होणार आहेत.
पहिल्या दिवशी रात्री साडेसात वाजता ‘पत्रकारितेतील दीपस्तंभ-डॉ. अरुण टिकेकर’ हा कार्यक्रम होणार असून यात राजीव खांडेकर, अभय टिळक, श्रीकांत बोजेवार, शुभदा चौकर हे सहभागी होणार आहेत.
५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता ‘तालवाद्याचा नवा उद्गाता’ या कार्यक्रमात ज्येष्ठ तालवाद्य वादक तौफीक कुरेशी यांची प्रकट मुलाखत होणार असून सोनिया परचुरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
६ फेब्रुवारी रोजी ‘वेध भविष्याचा’ तर ७ फेब्रुवारी रोजी ‘जाहिरातींचे जग’ हे चर्चात्मक कार्यक्रम होणार असून त्याची वेळी अनुक्रमे रात्री साडेसात व सात अशी आहे. ग्रंथ प्रदर्शन आणि अन्य सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.