मध्य भारतात वाऱ्यांची चक्रावाती स्थिती निर्माण झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन राज्यात थंडी कमी झाली आहे. मुंबईसह राज्यात तीन-चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबईचे कमाल तापमान मात्र ३० अंश सेल्सियसच्या खाली जाऊ शकते. तापमानात घट संभवत असल्याने नाताळची संध्याकाळ मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरू शकते.

राज्यात चार दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात आले.

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवडय़ात किमान तापमान कमी झाले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणात झपाटय़ाने बदल झाले आहेत. तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. या भागातून राज्याकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असले, तरी पावसाळी स्थितीमुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २३ आणि २४ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दिवशी कोकण आणि मराठवाडय़ातील हवामान कोरडे राहील. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. २६ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या दिवशी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढ, थंडीत घट : राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या अंशत: ढगाळ वातावरण आहे. परिणामी तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. मुंबई, रत्नागिरी, अलिबाग आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्येही पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंशांनी अधिक आहे. विदर्भात केवळ चंद्रपूर येथे सरासरीपेक्षा कमी १०.८ अंश तापमान आहे. हे रविवारचे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले.