टाटा ट्रस्टने देशभरातील चार सरकारी रुग्णालये करोना उपचार केंद्रांत परिवर्तित करून सरकारला हस्तांतरित केली आहेत. यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन रुग्णालयांचा समावेश आहे.

टाटा ट्रस्टने तयार केलेली ही रुग्णालये करोना रुग्णांबरोबरच इतर आजारांवरील रुग्णांच्या उपचारांकरिता आवश्यक त्या सुविधांसह सज्ज आहेत. राज्यात सांगली येथे ५० खाटांचे, तर बुलढाणा येथे १०४ खाटांचे आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे १६८ खाटा व गोंडा येथे १२४ खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे.  या प्रत्येक रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिया गृह, रक्ताची मूलभूत चाचणी करण्याची सुविधा, रेडिओलॉजी, डायलिसिस आणि रक्त साठवणुकीची सुविधा, तसेच टेलिमेडिसीन युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एन९५ मुखपटय़ा, हातमोजे, पीपीई किट इत्यादी वैद्यकीय साहित्याचेही राज्यांना वाटप करण्यात आले आहे.