झवेरी बाजार येथील इमारत दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी व तपास सुरू केला आहे. या धोकादायक इमारतीची म्हाडातर्फे दुरुस्ती सुरू होती. प्रत्यक्षात ही दुरुस्ती कोण करत होते, मजुरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आली होती का, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

श्यामशेठ मार्गावरील छप्पी चाळ इमारतीचा काही भाग शुक्रवारी दुपारी कोसळला. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाचे मुख्याधिकारी सुमंत भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत अंदाजे शंभर वर्षे जुनी असावी. साडेचार मजली इमारतीत एकूण ४१ खोल्या होत्या. त्यांपैकी ३७ खोल्यांमध्ये दुकाने आणि व्यापार सुरू होता. तर चार खोल्यांमध्ये रहिवाशांचे वास्तव्य होते. इमारतीत प्रत्येक मजल्यावर सार्वजनिक शौचालय आणि त्यासमोरील मोकळा भाग धोकादायक बनला होता. दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आमदार निधीतून दोन लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र इमारतीतील गाळेधारकांनी विरोध केल्याने दुरुस्ती बारगळली. या वर्षी गाळेधारकांना नोटिसा धाडून, समजतून काढून दुरुस्तीसाठी बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. कंत्राटदार नेमून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. इमारतीचा जो भाग धोकदायक होता तो दुरुस्तीसाठी पाडण्याचे काम सुरू होते. तेव्हाच ही दुर्घटना घडली. म्हाडाने ही इमारत वेळीच रिकामी केली नसती तर मोठय़ा प्रमाणात जीवित हानी होऊ शकली असती.

दरम्यान, शनिवारी दुपापर्यंत अग्निशमन दलाकडून शोधमोहीम, बचाव कार्य सुरू होते. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या चौथ्या आणि पहिल्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी पाचव्या अर्धमजल्यावरील छत कोसळले आणि प्रत्येक मजल्यावरील शौचालय, त्यासमोरील मोकळा भाग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढेपाळला.

या दुर्घटनेप्रकरणी तूर्त अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार कोण, त्याला म्हाडने नेमले की म्हाडाने नेमलेल्या कंत्रटादारने हे काम अन्य व्यक्तीला सोपवले, या कामाचा अनुभव, मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपाययोजना या सर्व बाबींची माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.