गोवंडीतील घटनेत १५ जण जखमी; वरच्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम

मुंबई :  गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात शुक्रवारी पहाटे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर या घरातील व्यक्तींसह लगतच्या घरांमधील १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शीव येथील लोकमान्य टिळक आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवाजी नगर परिसरातील प्लॉट क्रमांक ३ येथील दुमजली घर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक खाली कोसळले. त्या वेळी घरातील सर्व जण झोपले होते. काही समजण्यापूर्वीच घर एकदम कोसळल्यामुळे घरातील व्यक्तींना बाहेर पडणेच शक्य झाले. या वेळी घरात मोहम्मद परवेझ शेख (५०) यांच्यासह पत्नी शमशाद शेख (४५), मुलगी नेहा शेख (२४) आणि मुलगा फरहीन शेख (२२) आणि वडील  जबीर शेख (८०) होते. या घराचा वरचा मजला हा अनधिकृतरीत्या बांधलेला होता.

अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांना जाग आली. रहिवाशी येण्यापूर्वीच घरातील व्यक्ती ढिगाऱ्याखाली गेले होते. रहिवाशांनी लगेचच पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार काही वेळात या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान हजर झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेख कुटुंबातील सहा जणांना बाहेर काढले आणि राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी नेहा आणि जबीर शेख या दोघांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना फरहीन आणि तिची आई शमशाद यांचा मृत्यू झाला. शेख यांचे दुमजली घर कोसळल्याने आजूबाजूच्या घरांचाही काही भाग कोसळला. त्यामुळे या घरांमधील व्यक्ती जखमी झाल्या.

मोहम्मद शेख यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागलेला असून पुढील तपासण्या सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती तशी स्थिर आहे, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

या घटनेत आजूबाजूंच्या घरांमधील आणखी १४ जण जखमी झाले आहेत. यातील अमिना शेख (६०),  अमोल बढाई (३८), चामल सिंग (२५) या जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. यांना मुकामार, कमरेच्या हाडाला दुखापत आणि काही ठिकाणी अस्थिभंग झाला असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.

मोहम्मद फैजल कुरेशी (२१), नम्रा कुरेशी (१७) आणि शाहिना कुरेशी (२६) या जखमी झाल्या असून यांना शीव येथील लो. टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. तर शिवाजीनगर येथील बॉम्बे सिटी रुग्णालयात शहनाई मोहम्मद कु रेशी (२६), यास्मीन कु रेशी (२७), बिलाल कु रेशी (२७) यांच्यासह आणखी तीन जण उपचार घेत आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच घर खरेदी

मोहम्मद शेख यांनी दोन महिन्यांपूर्वीच हे घर खरेदी केले होते. नव्या घरात आल्यावर दोनच महिन्यांत ही दुर्घटना घडली आणि सारे कुटुंबच यात मृत्यू पावल्यामुळे शेख यांना मोठा धक्का बसला आहे.