मुंबई : सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्पात ठाणे खाडीवरून चार किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनही ठाणे खाडीमार्गेच जाणार आहे. या खाडीतून दोन मोठे प्रकल्प जाणार आहेत.  मानखुर्द ते वाशी या दोन स्थानकांदरम्यान हा चार किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग बनेल, अशी माहिती एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) देण्यात आली.  उन्नत प्रकल्पात ठाणे खाडीतील बांधकाम हे एक आव्हान असणार आहे.

गेली अनेक वर्षे चर्चेत असणारा सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्पाचे काम एमआरव्हीसीकडून केले जाणार आहे. एमयूटीपी-३ ए मध्ये या प्रकल्पाचा समावेश असून रेल्वे अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून त्याला अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पातील मानखुर्द ते वाशी दरम्यान असलेल्या ठाणे खाडीतील बांधकामावर एमआरव्हीसीकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खारफुटीच्या असलेल्या झाडांचे कमीत कमी नुकसान होऊन तब्बल चार किलोमीटपर्यंत उन्नत मार्ग बांधला जाणार आहे.

उन्नत प्रकल्पात याच मार्गाचे बांधकाम प्रथम हाती घेण्याचा विचार एमआरव्हीसीकडून सुरू आहे. त्यासाठी निविदा काढून हे काम संबंधित कंपनीला दिले जाईल. एकूण प्रकल्पात आठ स्थानके ही उन्नत तर तीन स्थानके समांतर असतील. मात्र या प्रकल्पाआधीच वांद्रे-कुर्ला संकुलातून निघणारा बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे खाडीतून ३० मीटर खोलीने कोपरखैरणे, घणसोलीमार्गे, शिळफाटय़ाच्या दिशेने जाईल. त्यामुळे ठाणे खाडीतील पक्षीजीवन संकटात सापडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाच सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गही याच खाडीतून जाणार आहे.

सीएसएमटी-पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्प

* ७५ मिनिटांचा प्रवास ४८ मिनिटांत होईल.

* सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द हे उन्नत मार्ग,  वाशी समांतर, नेरुळ, बेलापूर उन्नत आणि खारघर, पनवेल हे समांतर मार्ग असतील. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामार्गेही प्रकल्प जाणार आहे.

सीएसएमटी-पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्प

* ७५ मिनिटांचा प्रवास ४८ मिनिटांत होईल.

* सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द हे उन्नत मार्ग,  वाशी समांतर, नेरुळ, बेलापूर उन्नत आणि खारघर, पनवेल हे समांतर मार्ग असतील. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामार्गेही प्रकल्प जाणार आहे.