रात्री उशिरा घरी परतणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चौघांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. नोकरीच्या शोधानिमित्त ही महिला मुंबईत आली होती. घरी परतताना टॅक्सीचालकाने तिचे अपहरण करून आपल्या मित्रांसह तिच्यावर  बलात्कार केला. तिला एका व्यावसायिकाला विकण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी तिची सुटका केली.
दिल्लीची असलेली २० वर्षीय विवाहित महिला पतीशी भांडण झाल्यानंतर मुंबईत राहणाऱ्या बहिणीकडे आली होती. दरम्यान तिची डोंबिवलीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. शनिवारी त्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला शिळफाटा येथे बोलावले होते. रात्री उशिरा प्रियकराने तिला घरी जाण्यासाठी टॅक्सीत बसवले. परंतु टॅक्सीचालक नौशाद शेख (२५) याने तिला पवई येथे नेले. खूप रात्र झाली आहे असे सांगून तो तिला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अन्य दोन टॅक्सीचालक मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला.