करोना टाळेबंदीच्या चार महिन्यांत महानगरांतील व्यायामशाळा अस्थिपंजर अवस्थेला पोहोचल्या आहेत. उत्पन्न शून्यावर आल्याने जागेच्या मासिक भाडय़ाची पूर्तता, वीज देयके आणि व्यायाम साहित्याचा देखभाल-दुरुस्ती खर्च पेलताना व्यायामशाळांची हाडे खिळखिळी झाली आहेत. या आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्याची व्यायामशाळा चालकांची मागणी आहे.

करोना संकटामुळे रुतलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवडय़ात टाळेबंदी शिथिल करण्यात आली. टाळेबंदी शिथिल करताना त्यातून व्यायामशाळांना वगळण्यात आले. परिणामी मालक, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांवर अर्थ आघात झाला आहे. उत्पन्न शून्य आणि साहित्याच्या देखभालीचा महिन्याचा खर्च २५ ते ३० हजार अशा परिस्थितीमुळे व्यायामशाळाचालक रडकुंडीला आहे आहेत.

ठाणे

भाडय़ाचे ओझे जड

ठाणे शहरात लहानमोठय़ा सुमारे १५० व्यायामशाळा आहेत. त्यापैकी ८० टक्के व्यायामशाळा भाडय़ाच्या जागेत आहेत. जागेचे भाडे भरून अनेक व्यायामशाळा चालकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पन्न नसल्याने व्यायामशाळा पाच ते सहा प्रशिक्षकांना वेतन देणेही अवघड झाल्याचे ठाण्यातील व्यायामशाळाचालक सुरेश गवारी यांनी सांगितले. छोटय़ा व्यायामशाळांचे महिन्याला ३ ते ४ लाखांचे आणि मोठय़ा व्यायामशाळांचे १० ते १२ लाखांचे नुकसान होत असल्याची माहिती गुरुदत्त व्यायामशाळेचे दिगंबर कोळी यांनी दिली. करोना संकट काळातही दक्षता घेऊन आणि नियोजन करून व्यायामशाळा सुरू करता येऊ शकतील. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने व्यायामशाळा उघडण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी चालकांची मागणी आहे.

पुणे

५० हजारांचा रोजगार धोक्यात

पुणे शहरात सुमारे पाच हजार व्यायामशाळा आहेत. प्रत्येक व्यायामशाळेत आठ ते दहा कर्मचारी आहेत. या हिशोबाने पुण्यातील ५० हजार लोकांचा रोजगार या क्षेत्रावर अवलंबून आहे. व्यायामशाळा बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. ‘उत्पन्न नसल्याने जागेचे भाडे आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे कोठून आणायचे? व्यायामशाळा आणखी काही काळ बंद राहिल्या तर त्या बंद होतील, अशी भीती पुण्यातील व्यायामशाळा व्यावसायिक अतुल कुरपे यांनी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्यानंतरही संसर्गाच्या भीतीने लोक येतील की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नागपूर

आर्थिक घडी विस्कटली

नागपूर : व्यायामाकडे युवकांचा वाढता कल लक्षात घेऊन अनेक तरुणांनी बँकांकडून कर्ज घेऊन खासगी व्यायामशाळा सुरू केल्या. त्यात जमही बसवला, काहींनी व्यवसाय विस्तारही केला. मात्र टाळेबंदीमुळे आर्थिक घडीच विस्कटली आहे. शहरात ४५० ते ५०० छोटय़ा-मोठय़ा व्यायामशाळा आहेत. महिन्याला सुमारे ३० ते ४० लाखांची उलाढाल या व्यवसायात होत असे. आता ती थंडावली आहे. महालमधील ‘अरनॉल्ड गोल्ड जिम’चे संचालक मनीष बाथो म्हणाले की, बँकेकडून कर्ज घेऊन आम्ही हा व्यवसाय सुरू केला. आता हफ्ते भरणे अवघड झाले आहे. सरकारने आता अंत पाहू नये, या गोष्टींचा विचार करावा आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी द्यावी. बजरंज फिटनेस क्लबचे मनीष महल्ले म्हणाले, प्रशिक्षकांना वेतन देऊ शकत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यायामशाळा बंद असल्या तरी वीज देयक भरावेच लागते. परिस्थिती अशीच राहिली तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

व्यायमशाळा ही गरज

शरीराचा डौल राखण्याबरोबरच व्यायामाला सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु टाळेबंदीमुळे व्यायामशाळांनाही टाळे लागले आणि नियमितपणे व्यायामशाळेत जाणाऱ्यांची अडचण झाली. सध्या घरून काम करावे लागत असल्याने फारसे फिरणे होत नाही. पोट सुटणे, पोटाचे विकार, स्नायूंवर ताण अशा तक्रारी जाणवतात. व्यायामशाळांना बंदी का, असा सवाल नियमित व्यायामशाळेत जाणाऱ्या मुंबईतील सागर गायकवाड यांनी केला. करोना संकटकाळात बॉडी बिल्डर म्हणून नावाजलेल्या अनेकांना मिळणाऱ्या जाहिराती आणि प्रायोजकत्व मिळणे बंद झाले आहे.

घर चालवण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण

व्यायामशाळा प्रशिक्षकाला १४ ते १५ हजार मासिक वेतन मिळते. व्यायामशाळा बंद असल्याने चालकांनी प्रशिक्षकांचे वेतन थकवले आहे. परिणामी, प्रशिक्षकांची आर्थिक कुचंबणा सुरू आहे. काहींनी यातून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचा मार्ग निवडला आहे. व्यायामशाळेचे मालक एकवेळ तोटा सहन करू शकतील, परंतु प्रशिक्षकांना पोटापाण्यासाठी विविध प्रयोग करावेच लागतील, असे प्रशिक्षक सिद्धांत ठाकूर यांनी सांगितले. या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी एका व्यक्तीकडून महिन्याला ४०० ते ५०० रुपये शुल्क घेतले जात असल्याची माहिती उल्हासनगर येथील प्रशिक्षक निखिल कांबळे यांनी दिली.

अर्थआघात असह्य़..

मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांतील अनेक व्यायामशाळा भाडय़ाच्या जागेत चालवल्या जातात. त्यांना लाखो रुपयांचे मासिक भाडे भरावे लागते. त्यात महावितरणने वाढीव वीज देयके पाठवून या व्यावसायिकांना झटका दिला आहे. आर्थिक नुकसान असह्य़ झाले आहे. खर्च वाढल्याने कर्ज काढण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर व्यायामशाळा बंद करणे किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी चालकांची व्यथा आहे.

अडचणी काय?

* व्यायामशाळा बंद असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्चात वाढ, कर्ज घेण्याची वेळ

* उत्पन्नाअभावी जागेचे भाडे आणि प्रशिक्षकांचे वेतन देणे अवघड.

* व्यायामशाळा सुरू केल्या तरी भीतीमुळे लोक येतील की नाही, याची चिंता.

मागण्या काय?

*  व्यायामशाळा लवकरात लवकर सुरू करण्यास परवानगी द्या.

*  जागेचे भाडे भरण्यास राज्य सरकारने अर्थसहाय्य द्यावे.

*  करांमध्ये सूट द्यावी, वाढीव वीज देयके कमी करावीत

* संकलन : आशीष धनगर, प्रथमेश गोडबोले, नीलेश अडसूळ, राम भाकरे