चार महिन्यांपासून वीजपुरवठा नसल्याने शिक्षणाचा खोळंबा
विद्युत दिव्यांच्या रोषणाईने पर्यटकांची मने जिंकणारा राणीचा रत्नहार असेल किंवा गेट वे ऑफ इंडिया असेल तेथील दिव्यांमध्ये एका दिव्याची कमी झाली तरी तातडीने हालचाल करणाऱ्या यंत्रणांना मात्र गेल्या चार महिन्यांपासून अंधारात शिक्षण घेणारे तीन हजार विद्यार्थी दिसत नाहीत. गोरेगावातील आरे वसाहतीमध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत एप्रिल महिन्यापासून विजेची समस्या असून वीजप्रवाह सुरू करण्यासाठी विविध परवानग्यांच्या त्रांगडय़ातून शाळेले जावे लागले. या परवानग्या मिळवूनही आता केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शाळेत वीजपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी शाळेतील विद्यार्थी संख्याही घटू लागली आहे.
वीजपुरवठा कंपनी, आरे डेअरी प्रशासन, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्रालय हे सर्व एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे या शाळेलाही लालफितीचा फटका बसला असून विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. ही शाळा वन क्षेत्रात येत असल्यामुळे सुरुवातीला या शाळेला पोहोचेपर्यंत रस्ता नव्हता. याबाबत प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेतल्यानंतर खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर २६ एप्रिलपासून शाळेत वीजपुरवठा बंद झाला. यापूर्वी शाळेत वरून जाणाऱ्या विद्युतवाहिनीवरून वीजपुरवठा होत होता. मात्र ही जोडणी जमिनीच्या खालून करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या वेळेस यासाठी पुण्याहून राष्ट्रीय हरित लवादाकडून परवानगी आणण्याची सूचना आरेकडून करण्यात आली. यानंतर पालिकेने ती परवानगी मिळवली. पुढे
दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्रालयाकडून ही परवानगी आणावी असे सांगण्यात आले. या संदर्भात २६ जुलैपासून प्रस्ताव पाठविला असूनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सर्वाचा परिणाम शाळेच्या उपस्थितीवर होत असून विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे.
या शाळेत सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची ही दुरवस्था पाहून तेथे आपल्या मुलांना पाठविण्यास अनेक पालक तयार होत नसल्याचे निरीक्षणही शाळेतील शिक्षकांनी नोंदविले आहे. याचा परिणाम नुकत्याच पार पडलेल्या शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी आदिवासी पाडय़ात गेलेल्या शिक्षकांना विशेष जाणवला. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सूचना करणाऱ्या शिक्षकांनाच पालकांनी उलट प्रश्न केल्याचेही समजते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयातर्फे एक जनरेटर पुरवण्यात आला. मात्र तोही सोमवारी बंद पडला. शाळेला कायमस्वरूपी वीज मिळण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पालिकेचे शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी नमूद केले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान थांबावे, असेही दराडे म्हणाले.