मुंबईमधील करोनाबाधित चार व्यक्तींचा शनिवारी मृत्यू झाला असून नवे ५२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईतील करोनाच्या बळींची संख्या २२ वर, तर बाधितांचा आकडा ३३० वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे १४ रुग्णांना शनिवारी घरी सोडण्यात आले.

मुंबई महापालिका रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात शनिवारी दिवसभरात १९९ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९६ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल संशयितांची संख्या २४२७ वर पोहोचली आहे. करोनाची चाचणी नकारात्मक आल्यामुळे रुग्णालयात दाखल १४ जणांना शनिवारी घरी सोडण्यात आले असून घरी सोडलेल्यांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. मुंबईमधील सार्वजनिक आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत १० हजार  चाचण्या करण्यात आल्या असून अन्य शहर व राज्यांच्या तुलनेत त्या अधिक आहेत.

धारावीच्या डॉ. बालिगा नगरमधील एका इमारतीत ३० वर्षांच्या महिलेला, तर मुकुंद नगरमधील ४८ व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले असून धारावीतील करोनाबाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. तसेच मुकुंद नगरमधील व्यक्तीला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोनाबाधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती राहात असलेली इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. डॉ. बालिगा नगरमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करोनाची लक्षणे जाणवत असलेल्या नागरिकांची चाचणी करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे डॉ. बालिगा नगर प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्रतिबंधित केलेल्या बालिगा नगरमधील काही ज्येष्ठ नागरिकांना जेवण, अन्नधान्य, औषधे पालिकेकडून उपलब्ध करण्यात आले. मुकुंद नगरमधील करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांची राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रवानगी करण्यात आली आहे. डॉ. बालिगानगरमधील एकाचा करोनाने मृत्यू झाला असून अन्य चार जण बाधित झाले आहेत.

*  मुंबईमधील प्रतिबंधित करण्यात आलेला कोळीवाडा आणि धारावीतील डॉ. बालिगा नगरकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. वरळी कोळीवाडय़ात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने अखेर काही कोळीबांधवांनी जलमार्गे माहीम गाठल्यामुळे गोंधळ उडाला होता.

*  शासकीय यंत्रणांच्या मदतीने वरळी कोळीवाडय़ातील दुकानदारांनी अन्नधान्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून घेतला. त्यामुळे कोळीवाडय़ातील धान्याचा तुटवडा दूर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ वरळीतील जिजामाता नगरमध्येही करोनाबाधित सापडल्याने गोंधळात भर पडली.

*  दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या ज्येष्ठ नागरिकाचे वास्तव्य असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करून ती प्रतिबंधित करण्यात आली.

*  बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगरमधील एका इमारतीमधील रहिवाशाला करोनाची बाधा झाली असून ही इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. त्याचबरोबर दादरच्या एका शाळेच्या उपाहारगृहात काम करणाऱ्या महिलेला करोनाची बाधा झाली असून शाळेतील उपाहारगृह प्रतिबंधित करण्यात आले आहे.