मुंबई : गेल्या दोन दिवसांत मुंबईत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. यात मुलुंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ तांबे यांचा समावेश आहे.

तांबे यांना स्पष्ट लक्षणे  दिसत असूनही दोन चाचण्यांमध्ये करोनाचे निदान होऊ शकले नाही. ‘सीटी स्कॅन’मध्ये मात्र करोनाचे निदान झाले. परंतु, तोवर तांबे अत्यवस्थ झाले आणि पोलीस ठाण्यातील इतरांनाही संसर्ग झाला, असे सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात तांबे यांना ताप, सर्दी सुरू झाली. त्यांनी मुलुंड येथील खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू केले. त्यांचा ताप, खोकला, सर्दी कमी होत नसल्याने सहकाऱ्यांनी  त्यांची दोनदा करोना चाचणी करून घेतली. त्यांची प्रतिजन चाचणीही केली गेली. मात्र त्यातून करोनाचे निदान झाले नाही. ‘सीटी स्कॅन’मध्ये मात्र करोनाचे निदान झाले.

तांबे यांना ७ ऑगस्टला  कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेळेत निदान न झाल्याने सुमारे दोन आठवडे तांबे  यांच्यावर उपचाार होऊ शकले नाहीत. प्रत्यक्ष उपचार सुरू झाले तेव्हा त्यांची प्रकृती खालावली होती, असे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कफ परेड पोलीस ठाण्याचे हवालदार रविकांत साळुंके यांना गुरुवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग होताच २५ जुलैला त्यांना नागपाडा येथील करोना उपचार केंद्रात दाखल केले गेले. ९ ऑगस्टला त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र त्यांना पुन्हा करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी करोनामुळे मृत्यू, असे निरीक्षण नोंदवल्याचे कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले.

देवनार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक बाबर यांचाही गुरुवारी पहाटे नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात करोनामुळे मृत्यू झाला. पत्नी व दोन मुलांसह ते कामोठे येथे वास्तव्यास होते, असे देवनार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रागिनी जाधव यांनी सांगितले.

बुधवारी सफायर रुग्णालयात उपचार घेणारे मुलुंड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत सोनवणे(५५) यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाबाचाही त्रास होता, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.

आतापर्यंत ६१ बळी

मुंबई पोलीस दलातील साडेतीन हजार अधिकारी, अंमलदार करोनाबाधीत झाले. त्यापैकी सुमारे तीन हजार  करोनामुक्त झाले, मात्र ६१ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.