14 October 2019

News Flash

हार्बरवर पावसाळ्यानंतर चार नवीन गाडय़ा

एमयुटीपी-२ अंतर्गत सिमेन्स कंपनीच्या चार नवीन गाडय़ा मध्य रेल्वेला अजुनही मिळाल्या नव्हत्या.

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव

मुंबई : गैरसोयीची बैठक व्यवस्था व हवेशीर नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांच्या हालात भर टाकणाऱ्या गाडय़ा नेहमी हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या वाटय़ाला येतात. परंतु, आता हार्बरच्या प्रवाशांना काहिसा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर पावसाळ्यानंतर सिमेन्स कंपनीच्या आरामदायी, हवेशीर व अत्याधुनिक अशा चार नवीन लोकल दाखल होत आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्याच्या घडीला सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, अंधेरी या हार्बर मार्गासाठी ४४ लोकल गाडय़ा आहेत. यात आठ जुन्या लोकल आहेत. तर ३६ सिमेन्स कंपनीच्या आहेत. मात्र ४४ पैकी ४० लोकलच प्रवाशांच्या प्रत्यक्ष सेवेत असतात. ऊर्वरित चार गाडय़ा राखीव ठेवल्या जातात. हार्बरवरील २० ते २२ वर्ष जुन्या असलेल्या आठ गाडय़ांची कालमर्यादा संपुष्टात येत आहे. तर सेवेतील ३६ सिमेन्स गाडय़ांना आठ ते दहा वर्ष झाली आहेत. एमयुटीपी-२ अंतर्गत सिमेन्स कंपनीच्या चार नवीन गाडय़ा मध्य रेल्वेला अजुनही मिळाल्या नव्हत्या. या गाडय़ांची बांधणी चेन्नईतील कारखान्यात होत असून पावसाळ्यानंतर त्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेला नवीन लोकल मिळताच चार जुन्या लोकल सेवेतून बाद होतील. ४० सिमेन्स लोकल आणि चार जुन्या लोकल गाडय़ाच ताफ्यात राहतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पावसाळ्यात हार्बरवर सर्व सिमेन्स लोकल

हार्बरवर एकूण ४४ लोकल असून यात ३६ सिमेन्स कंपनीच्या आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात फक्त ३२ सिमेन्स लोकलच सेवेत ठेवल्या जातात. जुन्या गाडय़ांना खालच्या बाजूला असलेले मीटर रुळांपासून ३ ते ४ इंच वर असतात. तर सिमेन्स गाडय़ांना हेच मीटर साधारणपणे आठ इंच वर असतात. त्यामुळे पावसाळ्यात रुळ पाण्याखाली जाताच जुन्या गाडय़ांमध्ये बिघाड होतो. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. सिमेन्स गाडय़ांना तशी समस्या येत नाही. हे पाहता पावसाळ्यात सर्व ३६ सिमेन्स गाडय़ाच चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.

First Published on May 21, 2019 4:12 am

Web Title: four new local trains after rainy season on harbour line