पालिकेच्या खोल्या भलत्याच व्यक्तींच्या नावावर; गुन्हा दाखल करण्याचा निर्णय

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळींमधील एका इमारतीत पालिकेच्या शिक्षण विभागाच्या नावावर असलेल्या चार खोल्या परस्पर तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावावर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीडीडी चाळींतील आणखी काही खोल्या परस्पर अन्य व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

वरळी येथील बीडीडी चाळींमधील विविध इमारतींमध्ये पालिकेच्या नावे ३९ खोल्या आहेत. येथील दोन इमारतींमध्ये पालिकेच्या शाळा भरत होत्या. मात्र पटसंख्या घसरल्यामुळे या शाळा बंद कराव्या लागल्या. या वर्गखोल्यांमध्ये बाक आणि अन्य शालेय वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, बीडीडी चाळ क्रमांक ८४ मधील चौथ्या मजल्यावरील चार खोल्या परस्पर भलत्याच व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. शाखाप्रमुख विजय भणगे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दफ्तरी या खोल्या भलत्याच व्यक्तींच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. भणगे यांनी आयुक्त आणि शिक्षण विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र दखलच घेतली गेली नाही, अशी खंत शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी शिक्षण समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

या संदर्भात साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी या वर्गखोल्यांची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्याला पाठविले. या खोल्यांच्या दरवाजाला लावलेले पालिकेचे कुलूप तोडून भलतेच कुलूप लावल्याचे निदर्शनास आले.

सार्वजनिक बांधकाम विभागात केलेल्या चौकशीअंती या खोल्या २२ मार्च २०१८ रोजी अन्य व्यक्तींच्या नावावर करण्यात आल्याचे उघडकीस आले. पालिका अधिकाऱ्यांनी या खोल्यांचे कुलूप तोडून त्यांचा ताबा घेतला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आजही त्याच व्यक्तींकडून भाडे घेत आहे. भविष्यात पुनर्विकास झाल्यानंतर संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्यास पालिकेला आपल्या खोल्या गमवाव्या लागतील, अशी भीती सचिन पडवळ यांनी व्यक्त केली.

याप्रकरणी तक्रार करण्यासाठी पालिका अधिकारी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र नेमका कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

भाडेतत्त्वावर असलेली पालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने, घनकचरा व्यवस्थापन चौक्या, शाळांची जागा पुनर्विकासात जाण्याची शक्यता आहे. पुनर्विकासाच्या वेळी भाडेतत्त्वावरील जागांचा अ‍ॅनेक्सचरमध्ये उल्लेख करण्याऐवजी ‘लेटर ऑफ इंटेंट’मध्ये करावा. त्यामुळे या जागांवर पालिकेचा दावा कायम राहील. याबाबतच्या ठरावाच्या सूचनेवर अद्याप आयुक्तांनी अभिप्राय सादर केलाला नाही. प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. त्यामुळे पालिकेवर जागा गमावण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पालिकेची कबुली

शिक्षण विभागाच्या चार खोल्या तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याची कबुली पालिका आयुक्त मिलिन सावंत यांनी बैठकीत दिली. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन मिलिन सावंत यांनी दिले.