18 January 2019

News Flash

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार हजार संशोधन पत्रिकांची मान्यता रद्द

इकॉनॉमिक अॅिण्ड पोलिटिकल वीकलीसह एशियाटिक सोसायटी, ऑक्स्फर्ड, हार्वर्ड, सिम्बॉयसिसच्या नियतकालिकांना फटका

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| रसिका मुळ्ये

इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकलीसह एशियाटिक सोसायटी, ऑक्स्फर्ड, हार्वर्ड, सिम्बॉयसिसच्या नियतकालिकांना फटका

देशातील संशोधनाला शिस्त लावावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या शोधपत्रिकांच्या यादीतून चार हजार शोध नियतकालिकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, तर १९१ नियतकालिकांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक बोगस नियतकालिकांची मान्यता रद्द करताना काही नामांकित शोध पत्रिकांनाही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेत कमी पडल्याचा फटका बसला आहे. अनेक विषयांतील शोधपत्रिकांचे पर्यायच कमी झाले आहेत.

देशात लाखोंच्या घरात प्रसिद्ध होणाऱ्या शोधपत्रिकांमध्ये आपला कोणत्याही विषयाचा निबंध प्रसिद्ध करून ‘संशोधक’ होणाऱ्यांना चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वर्षांपूर्वी संशोधनाला शिस्त लावण्याची मोहीम सुरू केली. शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा लाभ प्राध्यापकांना वेतनवाढ, पदोन्नती मिळण्यासाठीही होतो. हे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शोधपत्रिकांच्या शोधात असलेल्या प्राध्यापकांची गरज भागविणाऱ्या शोधपत्रिका गल्लोगल्ली सुरू झाल्या. या पाश्र्वभूमीवर शोधपत्रिकांची तपासणी करून त्यांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केली. आयोगाच्या यादीतील शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधांनाच मान्यता देण्याचे धोरण आयोगाने आखले. मात्र प्रत्येक विद्यापीठ, प्रकाशक, संशोधनसंस्थांच्या अर्जानंतर ही यादी तब्बल ३२ हजार शोधपत्रिकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर यादीतील अनेक शोधपत्रिकांच्या दर्जाबाबत टीका होऊ लागली. परदेशातील परिषदा, संस्थांमध्येही भारतातील बोगस शोधपत्रिकांचे विषय चर्चेत येऊ लागले. त्यानंतर आयोगाने सर्व पत्रिकांची पुन्हा तपासणी करून ४ हजार ३०५ पत्रिका यादीतून कमी केल्या आहेत, तर १९१ पत्रिकांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

नामांकित पत्रिकाही बाद

इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली, फिशरीज असोसिएशन, इडियन जर्नल ऑफ मेंटल हेल्थ, निर्मला निकेतन, एशियाटिक सोसायटी, इंडियन आर्कियालॉजिकल सोसायटी, भारतीय इतिहास संशोधन परिषद, इंडियन हिस्टरी कॉंग्रेस.

अनेक विषयांचे पर्याय कमी : संगीत, राज्यशास्त्र, ललित कला, उपयोजित कला अशा काही विषयांच्या पत्रिकांची संख्या मुळात कमी आहे. विद्यापीठाचे काही विभाग या पत्रिका काढतात. त्यांच्यासाठीही आयोगाने नकारघंटा वाजवल्यामुळे या विषयांसाठीचे पर्याय कमी झाले आहेत.

First Published on May 5, 2018 12:58 am

Web Title: four thousand research papers canceled by university grants commission