मुंबईत दररोज तीन ते चार वाहनांची चोरी होते आणि आठवडय़ातून एखादे वाहन सापडते, अशी परिस्थिती आहे. दुचाकी चोरींचे प्रमाण सर्वाधिक असून तुलनेत त्या सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पाजेरो, तवेरा, स्कॉर्पिओ आदी चोरीची वाहने सध्या नेपाळ, भूतानमध्ये नेऊन विकली जात आहेत. ही चोरीची वाहने परत आणणे पोलिसांच्या दृष्टीने आव्हान बनले आहे.
या चोऱ्या प्रामुख्याने पहाटे तीन ते पाचमध्ये दुचाकींची चोरी तर दिवसाढवळ्याही होते. अनेक ठिकाणी वाहनचोरी सीसीटीव्ही यंत्रणेत चित्रबद्ध होऊनही पोलिसांना शोध घेता आलेला नाही. या शोधासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र पथक आहे. या पथकाने काही टोळ्याही पकडल्या आहेत. तरीही चोरीचे प्रमाण घटलेले नाही.
अनेक महागडय़ा गाडय़ांना सध्या अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे या गाडय़ांच्या चोरींची संख्या कमी आहे. गाडी कितीही सुरक्षित केली तरी ती चोरली जात असल्याचा अनुभवही काहीजणांना येत आहे. गाडीत अत्यंत संरक्षक यंत्रणा असूनही इनोव्हाच्या चोऱ्यांचे प्रमाणही सध्या वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मध्यंतरी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून तब्बल ६० इनोव्हा चोरीला गेल्याचे समजते.
सुरुवातीला गाडी चोरल्यानंतर ती काही काळ मुंबईतील काही अड्डय़ांवर ठेवली जाते. त्यानंतर गाडीचा क्रमांक बदलून आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती राज्याबाहेर नेली जाते. प्रामुख्याने उत्तर प्रदेशात अशा अनेक गाडय़ा यापूर्वी नेल्या जात होत्या. परंतु आता चोरीच्या गाडय़ा नेपाळ, भूतानमध्ये जाऊन विकल्या जातात. गाडीचा शोध लागला तरी तेथून ती परत आणणे कठीण आहे. या प्रक्रियेसाठी जो खर्च येतो आणि वेळेचा अपव्यय होतो, तो पाहता मालकाला विम्याच्या पैशातून नवी गाडी घेणे परवडते, असेही हा अधिकारी म्हणाला. एका विमा कंपनीने अशाच चोरीला गेलेल्या गाडीचा नेपाळमध्ये शोध घेतला. तेथे ती टूरिस्ट म्हणून वापरली जात होती. या कंपनीने ती आरक्षित केली आणि भारतात आणताच चोरीची गाडी म्हणून ताब्यात घेतली, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.