चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या असतात. परंतु मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ५ ने एक आगळीवेगळी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीत चार महिला असून त्या सख्ख्या बहिणी आहेत. अनेक वर्षांपासून त्या एकत्र चोरी करत होत्या. भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी आलेल्या चौघींपैकी तीन बहिणींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आदी ठिकाणी चोऱ्यांमध्ये वाढ झाली होती. एका प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही महिला दिसून आल्या होत्या. गुन्हे शाखा ५ चे पोलीस हवालदार संतोष पाटील यांना अनिता पाटील (२६) या महिलेबाबत माहिती मिळाली. जोगेश्वरी पूर्व येथील श्याम नगरमध्ये आपल्या भावाला ओवाळण्यासाठी अनिता व तिच्या बहिणी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अनितासह सुजाता रफिक शेख (२४), मीना इंगळे यांना अटक केली.
चोरीची अनोखी पद्धत
या चौघींनी चोरी करण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली होती, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी सांगितले. फूटपट्टीच्या सहाय्याने कुलूप उघडण्याची कला त्यांना अवगत होती. दोन बहिणी कुलूप उघडत असताना इतर दोघी पहारा द्यायच्या. स्त्री असणे हे त्यांचे अस्त्र होते. कुणाला संशय आला तर त्या कांगावा करायच्या. अतिशय चांगला पेहराव असल्याने कुणाला संशयही येत नसे. यापैकी केवळ सुजाताला दोन वेळा अटक झाली आहे. या चौघींनी आतापर्यंत ५० हून अधिक चोऱ्यांची कबुली दिलेली आहे.