मुंबईतील एका रहिवासी इमारतीत एका चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. ट्राँबे या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. रिझवाना नावाची ही महिला आहे तिने चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. लिफ्टमध्ये शिरताच तिने चार वर्षांच्या मुलीला जोरात फटके दिले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल याची कल्पना या महिलेला सुरुवातीला नव्हती. पण ती कल्पना येताच तिने लाइट बंद केले. असे असले तरीही लिफ्टच्या नाईट व्हिजन कॅमेरात सगळा प्रकार कैद झाला आहे. ही महिला चार वर्षांच्या मुलीला मारहाण करत असताना काहीतरी मंत्र पुटपुटताना दिसते आहे त्यावरून ही चेटुक करत असावी असाही अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

कारण आरोपी रिझवानाने या मुलीला मारहाण केल्यावर ती तिच्या अंगावरही बसली होती. मुलीच्या आईला हा सगळा प्रकार समजला तेव्हा तिने आरडाओरडा केला. ज्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी रिझवाना शेख या महिलेला अटक केली आहे. तिच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे घडलेल्या प्रकारामुळे चार वर्षांच्या मुलीच्या अंगावर काही जखमा झाल्या आहेत. तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे या मुलीच्या मनात भीती बसली आहे.