बिहारहून आणलेल्या चार वर्षांच्या पुतणीला घरकामाला जुंपणाऱ्या व तिला सातत्याने अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेला टिटवाळा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. टिटवाळ्यातील सरनौबत नगरमधील यादव कुटुंबीयांच्या घरात हा प्रकार उघडकीस आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी नरेंद्र यादव यांनी आपल्या भावाच्या लीना राजेंद्र यादव या मुलीला बिहारहून टिटवाळ्यात संगोपन व शिक्षणासाठी आणले होते. परंतु, तिचे संगोपन करण्याऐवजी काकू प्रमिला ही तिच्याकडून घरातील झाडूकाम, भांडी, कपडे धुणे अशी कामे करून घेत असे. तसेच तिला मारहाणही करत असे.
गेले कित्येक दिवस शेजारीपाजारी हा प्रकार पाहात होते. मात्र, टिटवाळय़ातीलच अंजना सरनौबत या गुरुवारी सकाळी यादव यांच्या घराजवळून जात असताना त्यांना लीना मोठय़ाने रडत असल्याचे आढळले. लीनाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे तसेच तिच्या सर्वागावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यांनी ताबडतोब हा प्रकार आपले पती व उपमहापौर बुधाराम सरनौबत यांच्या कानावर घातला. त्यांनी तातडीने लीनाला टिटवाळा पोलीस ठाण्यात नेले. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने पोलीस अंमलदार वाघ यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला.
तात्काळ मुलीला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्या कमरेच्या हाडाला, दोन्ही हातांना बेदम मारहाण झाल्याचे आढळून आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुकडे यांनी त्या मुलीवर उपचार सुरू केले. मुलीला अधिक मार असल्याने तिला ठाण्याच्या नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या मुलीचा काही दिवस आपण स्वत: सांभाळ करणार आहोत. या मुलीच्या रुग्णालयातील सेवेसाठी आपण स्वत: एक कार्यकर्ता तैनात केला आहे. या मुलीचे वडील बिहारहून आल्याशिवाय आपण या मुलीचा कोणालाही ताबा देणार नाही, असे सरनौबत यांनी सांगितले.