मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

मुंबई : ऑनलाइन भामटय़ांनी फसव्या ई-मेलद्वारे कॉर्पोरेट कंपन्यांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यांत नोंद गुन्ह्य़ांवरून हे स्पष्ट होते.

बडे उद्योग समूह, वित्त संस्थांच्या मुख्यालयातील बहुतांश आर्थिक व्यवहार ई-मेलद्वारे हाताळले जातात. म्हणजे वरिष्ठ अधिकारी ई-मेल धाडून हाताखालच्या सहकाऱ्याला संबंधित कंपनी, व्यक्ती, बँक किंवा संस्थेला ठरावीक रक्कम अदा करण्याच्या सूचना देतो. अधिकृत ई-मेल आयडीला साजेसा आयडी भामटे तयार करतात. पाहताक्षणी लक्षात येणार नाही किरकोळ बदल असलेला पण अधिकृत भासणाऱ्या आयडीवरून हाताखालच्या सहकाऱ्याला ई-मेल धाडतात. त्यात संबंधित कंपनीच्या ओळखीतल्या व्यक्ती, संस्थांच्या नावे पैसे वळते करण्याची सूचना असते. दिवसभरात सतत ई-मेलवरील सूचनांवरून आर्थिक व्यवहार करता करता मध्येच येऊन पडलेल्या बनावट, बोगस ई-मेल लक्षात येत नाही. व्यवहार केल्यानंतर मात्र बोगस ई-मेलमुळे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात पैसे वळते केल्याची उपरती होते.

या गुन्हे प्रकारात ऑनलाइन भामटय़ांकडे कंपनीतील नेमक्या अधिकाऱ्यांची माहिती असतेच. पण कंपनीसोबत रोजच्या रोज आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचीही पक्की माहिती असते. ही माहिती कंपनीत कार्यरत किंवा आधी काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून मिळवली जाते. तसेच ग्राहक म्हणून संपर्क साधून टप्प्याटप्प्यानेही घेतली जाते.

महाराष्ट्र सायबर विभागानुसार अशा प्रकारचे गुन्हे संख्येने कमी घडतात, पण त्यात फसवणुकीची रक्कम कोटय़वधींची असते. त्यासाठी बडय़ा कंपन्या, उद्योगसमूह, वित्त संस्थांनाच लक्ष्य केले जाते. चित्रपट निर्मात्यासह चित्रपटांसाठी आवश्यक तयार कपडे भाडय़ाने देणाऱ्या कंपनीला अशाचप्रकारे गंडा पडला होता. कपडे भाडय़ाने देणाऱ्या कंपनीचा ईमेल आला असे समजून निर्मात्या कंपनीने खातरजमा न करताच ईमेलमध्ये नमूद बँक खात्यावर लाखो रुपये अदा केले. काही दिवसांनी दोन्ही कंपन्यांमध्ये व्यवहाराबाबत चर्चा झाली तेव्हा पैसे पाठवले, पैसे मिळाले नाहीत, असे आरोपप्रत्यारोप सुरू झाले. ईमेलवर नमूद बँक खात्याची तपासणी केली गेली तेव्हा ते खाते भलत्याच व्यक्तीचे होते असे स्पष्ट झाले. मुंबईत आतापर्यंत असे १८ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत चार गुन्हय़ांचीच नोंद होती.

दोन वर्षांतील फसवणूक

वर्ष/गुन्हे                                              २०१८             २०१९

ई-मेलद्वारे फसवणूक                             ४                    १८

आमिष दाखवून फसवणूक (फिशिंग )      २                    ९

अश्लील ई-मेल, लघुसंदेश                      १३८                 १०९

बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक         २७३                 २३८