रेस्तरॉ मालकाची दोन लाख अमेरिकी डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी एका शेफविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केल्वीन चंग असे शेफचे नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वांद्रे येथील नामांकीत बॅस्टीअन रेस्तरॉमध्ये केल्वीन हा शेफ म्हणून काही वर्षे कामाला होता. आपले वडील अमेरिकेत नामांकीत साखळी रेस्तरॉची फ्रेचायझी घेणार असल्याचे भासवून त्याने बॅस्टीअन रेस्तरॉच्या दोन मालकांपैकी एकास यात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार २०१५ मध्ये या व्यावसायिकाने सुमारे दोन लाख अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली.

काही दिवसांनी वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्याने मालकाला सांगितले. पुढील काही दिवसांत कोणतीही पूर्वसूचना न देता केल्वीन निघून गेला. त्यानंतर रेस्तरॉ मालकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने टाळाटाळ सुरू केली.

काही दिवसांपूर्वीच तो भारतात परतल्याचे या व्यावसायिकाला समजले. त्यानंतर त्यांनी खार पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी केल्वीनविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.