दोघा सायबर भामट्यांना राजस्थानातून अटक

मुंबई : ‘ओएलएक्स’वरून गाडी विक्रीच्या बहाण्याने चांदिवलीतील रहिवाशाची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला साकीनाका पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. उन्नस कमरूद्दीन खान (३४) असे अटक के लेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात चांदिवलीतील हरिश्वार यादव यांना अ‍ॅक्टिवा दुचाकी विक्रीच्या बहाण्याने या भामट्याने त्यांच्याकडून ३५ हजार रुपये लुटले होते.

खानने ‘ओएलएक्स’ या खरेदी-विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून यादव यांनी खानला संपर्क केला. त्याने लष्करातील अधिकारी असल्याचे यादव यांना भासविले. दुसरीकडे बदली झाल्याने ही दुचाकी विकून तात्काळ परगावी जायचे आहे, असा बहाणा त्याने केला. तसेच प्रत्यक्ष भेटणे शक्य नसून दुचाकीच्या बदल्यात १५ हजार रुपये पेटीएम अ‍ॅपद्वारे पाठविण्यास सांगितले. खानने लष्करातील ओळखपत्र व्हॉट्सअपद्वारे पाठविल्याने यादव यांचा त्याच्यावर विश्वाास बसला. त्यामुळे त्यांनी खानला १५ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर दुचाकी नोंदणीसारख्या विविध कारणांसाठी म्हणून खानने त्यांच्याकडून आणखी २० हजार रुपये काढून घेतले. यासंदर्भात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी साकीनाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांनी तांत्रिक तपास सुरू केला. आरोपीने बनावट खात्याद्वारे व्यवहार केला होता. या बँक खात्यांच्या विश्लेषणातून पोलिसांनी खानचा शोध घेतला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले आणि पोलीस शिपाई संग्राम जगताप यांच्या पथकाने राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खानला अटक केली.

ऑनलाइन मद्यविक्रीच्या बहाण्याने लुटणारा भामटा अटकेत

दुसऱ्या एका घटनेत एका मराठी अभिनेत्रीला ऑनलाइन फसविणाऱ्या सायबर भामट्यालाही साकीनाका पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. ऑनलाइन मद्य विक्रीच्या बहाण्याने तिच्या खात्यातून या भामट्याने पैसे लुटले होते. ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती. बरकत सहाबुद्दीन (२८) असे या सायबर भामट्याचे नाव आहे.  तांत्रिक तपासात बरकत यानेच फसवणूक के ल्याचे निष्पन्न होताच, पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांच्या पथकाने राजस्थानमधील भरतपूर येथून २२ जानेवारीला त्याला ताब्यात घेतले. दरम्यान बरकत याच्यावर राजस्थानात आणखी गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.