पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्य़ांचा समावेश

कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आणि गरीब रुग्णांसाठी खर्चीक ठरणाऱ्या केमोथेरपीची सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार आहे. येत्या जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार असून, यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या १० जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात सुमारे ११ लाख कर्करोगग्रस्त नव्याने आढळून येतात. सध्या सुमारे २८ लाख रुग्ण या रोगाशी झुंज देत आहेत, तर दरवर्षी पाच लाख मृत्यू कर्करोगामुळे होतात.

राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना आता केमोथेरपीसाठी मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. यामुळे त्यांचा निवासाचा आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून रुग्णाला होणारा मानसिक ताण आणि शारीरिक त्रास कमी होऊन स्थानिक स्तरावरच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्य़ांचा समावेश करण्यात आला आहे.

गरज का?

कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी रुग्णाला मुंबईतील टाटा रुग्णालयातर्फे आवश्यकतेनुसार सुमारे सहा आठवडय़ांचा केमोथेरपी कोर्स दिला जातो. यासाठी मुंबईबाहेरील रुग्णाला दर आठवडय़ाला लांब प्रवास करून यावे लागते. यात रुग्णांना प्रवासासोबतच इतर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन केमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.