एखाद्या ठिकाणी खरेदीला गेल्यावर आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की, जर या दुकानाचे सवलत कूपन आपल्याजवळ असते तर आपली खरेदी आणखी कमी पैशात झाली असती. पण हे कूपन आपल्याला विकत घ्यावे लागतात किंवा कोणी तरी आपल्याला हे कूपन्स भेट म्हणून दिलेले असतात. यानंतर काही मर्यादित कालावधीत आपल्याला या कूपन्सचा वापर करावा लागतो. ई-बाजार स्थळांचा वापर जसा वाढू लागला तसा तेथेही ई-कूपन्सची गर्दी जमू लागली. मात्र आपण ई-बाजारात खरेदीसाठी जात आहोत आणि त्या संकेतस्थळावर जाण्यापूर्वी आपणच आपल्याला फायदेशीर ठरतील अशी ई-कूपन्स घेऊ शकतो. हे शक्य झाले आहे ते https://www.coupondunia.in या संकेतस्थळामुळे . सर्व ई-व्यापार संकेतस्थळांसह विविध ब्रॅण्ड्सचे कूपन्स या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मूळचा भारतीय वंशाचा असलेल्या; परंतु जन्मापासून अमेरिकेत वाढलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या समीर पारवानी याच्या डोक्यात अमेरिकेतच नोकरी करत असताना ग्राहकांना कूपन्स उपलब्ध करून देणाऱ्या सुविधेची संकल्पना आली. अभियांत्रिकी डोकॅलिटीचा वापर करून समीरने एका आठवडय़ात मिळालेल्या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये कूपन दुनियाचे संकेतस्थळ उभे केले. भारतीयांसाठी सोयीच्या अशा कूपन्सचा यामध्ये त्याने समावेश केला. सुरुवातीच्या काळात समीर संकेतस्थळाचे काम करण्यासाठी नोकरी सांभाळून दिवसाला दोन तास देत असे. सहा महिने संकेतस्थळ चालवल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता समीरने भारतात येण्याचे ठरले. भारतात शिक्षण घेऊन परदेशात गेलेली व्यक्ती पुन्हा भारतात का परतायचे, असा विचार करते. पण जन्मापासून अमेरिकेत वाढलेल्या समीरला मात्र व्यवसायाच्या उद्देशाने का होईना भारताकडे यावेसे वाटले. यानुसार २०१०मध्ये समीर भारतात आला आणि त्याने संकेतस्थळाचे पूर्णवेळ काम सुरू केले. संकेतस्थळासाठी आवश्यक त्या तज्ज्ञांचा चमू त्याने एकत्रित आणला आणि काम सुरू झाले.

ई-व्यापार संकेतस्थळांवरील विविध कूपन्सची माहिती आपल्याला संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर गेल्याशिवाय मिळत नसे. यामुळे सध्या ई-बाजारात असलेल्या सर्व दुकानांची अर्थात सर्व संकेतस्थळांवरील कूपन्स एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची या संकेतस्थळाची मूळ कल्पना होती. यानुसार विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे सवलतीचे किंवा विविध ऑफर्सचे कूपन्स या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. ग्राहकांना या संकेतस्थळावर लॉगइन करून त्यांना फायदेशीर वाटेल ते कूपन निवडून पुढचा व्यवहार करू शकतो. यामध्ये ग्राहकांना कोणतीही रक्कम खर्च करावी लागत नाही. यामुळे येथील कूपन्सचा वापर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. या संकेतस्थळावर सध्या फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या दोन हजारहून अधिक विक्रेत्यांनी कूपन्स ठेवले असून यात मोबाइल रिचार्जपासून ते अनेक कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे.

या संकेतस्थळाचे व्यावसायिक स्वरूप खूपच स्पष्ट आणि सुयोग्य असल्यामुळे कंपनीला जास्त गुंतवणुकीची गरज भासली नाही. कंपनीला अल्पावधीत उत्पन्न सुरू झाले यामुळे केवळ कंपनीतील निधीपुरवठा सुरू राहण्यासाठी समीरने आपले नातेवाईक आणि मित्रमंडळींकडूनच काही निधी जमा केला होता, अशी माहिती कंपनीची सीओओ अंकिता टंडनने दिली. कंपनीचा मुख्य उत्पन्नस्र्रोत हा ई-व्यापार संकेतस्थळांकडून मिळणारे कमिशन हेच आहे. यामध्ये आपण कूपन दुनियावरील कूपनचा वापर करून एखादा व्यवहार केला तर आपण खरेदी केलेली वस्तू आपल्याकडे पोहोचून आपण ती ठरावीक कालावधीत परत केली नाही याची खात्री झाल्यानंतरच ई-व्यापार कंपन्या कूपन दुनियाला कमिशन देतात. यामुळे केवळ कूपनचा वापर झाला म्हणून कमिशन मिळते असे नसल्याने ई-व्यापार कंपन्या कंपनीशी जोडल्या गेल्याचे अंकिता सांगते. याचबरोबर या कंपनीतील समभागांचा मोठा हिस्सा नुकताच एका बडय़ा इंटरनेट कंपनीने घेतल्याची माहितीही तिने दिली.

भविष्यातील योजना

संकेतस्थळावर नुकतीच कॅश बॅकची योजना सुरू करण्यात आली आहे. या कंपनीला ई-व्यापार कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमिशनमधील काही रक्कम ग्राहकांना देण्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती अंकिताने दिली. ग्राहकांच्या खात्यावर जमा झालेली ही रक्कम ग्राहक त्यांच्या बँक खात्यात, पेमेंट वॉलेटमध्ये किंवा रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. याचबरोबर भविष्यात कंपनीच्या संकेतस्थळावर वस्तूंच्या किमतीची तुलना देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकाला एकाच संकेतस्थळावर आल्यास त्याला पाहिजे ते उत्पादन कोणत्या संकेतस्थळावर किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर त्यावर कोणते कूपन्स उपलब्ध आहेत याचा तपशील मिळू शकणार असल्याचे अंकिताने स्पष्ट केले.

नवउद्यमींना सल्ला

सध्या देशात नवउद्योगांना सुगीचे दिवस आहेत. यामुळे अनेक तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असे वाटते. मात्र हा व्यवसाय सुरू करताना त्याचे उत्पन्नस्रोत काय असतील हे स्पष्ट असणे गरजेचे असल्याचा सल्ला अंकिताने नवउद्यमींना दिला आहे. केवळ या गुंतवणुकीवर अवलंबून न राहता कंपनी स्वत:च्या पायावर कशी उभी राहील याचा विचार होणे गरजेचे आहे. या गुंतवणुकीवर अवलंबून राहिल्यास एकदा ती गुंतवणूक संपल्यावर पुढे काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे कंपनी उत्पन्न कसे मिळवू शकते हे स्पष्ट असणे गरजेचे असल्याचेही अंकिताने नमूद केले.

Niraj.pandit@expressindia.com