21 January 2021

News Flash

एनएससीआय, पोद्दार रुग्णालयात मोफत चाचण्या

अहवाल प्रलंबित असलेल्यांसाठी ‘प्रतीक्षा कक्ष’

अहवाल प्रलंबित असलेल्यांसाठी ‘प्रतीक्षा कक्ष’

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला असून वरळी, प्रभादेवीतील रहिवाशांसाठी एनएससीआय आणि पोद्दार रुग्णालय या ठिकाणी मोफत चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. तसेच लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना आपला अहवाल येईपर्यंत थांबता येईल असा ‘प्रतीक्षा कक्ष’ही सुरू करण्यात आला आहे.

मुंबईत सध्या दरदिवशी सरासरी साडेसात हजार चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या कमी केल्या जात असल्याबद्दल पालिकेवर नेहमी टीका होत असते. त्यामुळे पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे ठरवले आहे. मुंबईतील ज्या विभागांमध्ये मृत्युदर जास्त आहे, अशा नऊ विभागांत दर दिवशी ५०० पर्यंत चाचण्या करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहेत. पण अन्य विभागांनाही चाचण्या वाढवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच विभागांनी मोफत चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यात प्रतिजन आणि घशातील स्राव घेऊन केली जाणारी आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्यांचा समावेश आहे. याच अंतर्गत वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागाच्या एनएनसीआय करोना उपचार केंद्रात व पोद्दार रुग्णालयात येऊन वरळी, प्रभादेवीतील रहिवाशांना चाचणी करता येणार आहे.

जास्तीत जास्त चाचण्या करून वेळेत रुग्ण शोधल्यास त्याच्यावर वेळेत उपचार करता येतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशाने चाचण्या वाढवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. वरळीचा मृत्युदर कमी असून रुग्णसंख्याही आटोक्यात आली आहे. मात्र तरीही कोणाला लक्षणे दिसत असतील तर त्यांचे वेळेत निदान व्हावे यासाठी आम्ही विभागात मोफक चाचण्यांची शिबिरे घेत असतो. मात्र त्याचबरोबर आता वरळीच्या एनएससीआय केंद्रात आणि पोद्दार रुग्णालयातही मोफत चाचण्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

प्रतीक्षा कक्ष

ज्या रुग्णांना लक्षणे असतात त्यांच्या चाचण्या केल्यानंतर अहवाल येईपर्यंत त्यांना थांबता येईल, असे प्रतीक्षा कक्ष पोद्दार व एनएससीआयमध्ये करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेकदा रुग्णाला लक्षणे असली आणि अहवाल प्रलंबित असला की त्या रुग्णांच्या मनात शंकाकुशंका येतात. लहान घरात राहणाऱ्या अशा रुग्णांना वेगळे राहणेही अवघड असते. तसेच ते बाधित असतील तर त्यांच्यापासून संसर्गाचा धोकाही असतो. त्यामुळे अशा अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी ‘प्रतीक्षा कक्ष’ तयार करण्यात आले आहेत.

प्रतिजन चाचणीचा अहवाल लगेच येत असला तरी आरटीपीसीआर चाचणीसाठी सात ते आठ तास किंवा त्याहून जास्त वेळ लागतो. या वेळात रुग्णांना थांबता येईल म्हणून एनएससीआयमध्ये ५० खाटा व पोद्दारमध्ये १० खाटा ठेवल्या आहेत. रुग्णाचा अहवाल बाधित आला तर त्याला लगेच तिथेच दाखल करता येईल.

– शरद उघडे, साहाय्यक आयुक्त, जी दक्षिण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:17 am

Web Title: free covid 19 test at nsci and poddar hospital zws 70
Next Stories
1 परदेशी पर्यटकांविना कुलाबा बाजार ओस
2 ‘मेट्रो ६’ मार्गिकेचे काम सुलभ
3 मेट्रो १ मधील हिस्सा विकण्याच्या ‘आर इन्फ्रा’च्या हालचाली
Just Now!
X