करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम आणि अन्य आयुर्वेदिक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली. औषधे खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात मुश्रिफ यांनी सांगितले की, आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून करोनाचा मुकाबला करण्यासाठी जनतेला तत्परतेने मोफत औषधे पुरविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करायची आहेत. ही प्रक्रिया व औषध वाटप तीन आठवडय़ांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.

करोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता होमियोपॅथिक अर्सेनिक अल्बम औषध चांगली कामगिरी करते, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हे औषधे खरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. ग्रामविकास विभागाने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज यातून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील पाच कोटी लोकांना विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीसाठी निविदा काढली होती. परंतु ज्या दरामध्ये औषधे मिळणे आवश्यक होते तो उद्देश साध्य होऊ शकला नाही. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.