एसटीच्या बसगाडय़ांमध्ये ‘वाहक विरुद्ध प्रवासी’, ‘प्रवासी विरुद्ध प्रवासी’ अशा विविध भांडणांचे ‘मनोरंजन पॅकेज’ अधेमधे उपलब्ध होते. मात्र आता अशा मनोरंजनाऐवजी प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एसटीत खऱ्याखुऱ्या मनोरंजनाची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी हॉटस्पॉट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्याद्वारे निवडक चित्रपट, त्यातील दृष्ये, गाणी यांचा आस्वाद प्रवाशांना आपल्या स्मार्टफोनवर लुटता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टींची चाचपणी चालू असून येत्या तीन-चार महिन्यांत प्रायोगिक तत्त्वांवर काही लांब पल्ल्याच्या बसगाडय़ांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एसटी महामंडळाचा संचित तोटा प्रचंड असून गेल्या काही वर्षांपासून एसटीचे प्रवासी भारमानही दोन टक्क्यांनी खालावले आहे. त्यामुळे प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एसटीने विविध योजना सुरू केल्या आहेत. सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हॉटस्पॉट तंत्रज्ञानाच्या आधारे मनोरंजनाचा हा नवा प्रयोग राबविला जाणार आहे.
त्यासाठी एसटीच्या बसगाडय़ांमध्ये ‘सेट टॉप बॉक्स’सारखे एक यंत्र बसवण्यात येईल. या यंत्रात निवडक ५० चित्रपट, काही चित्रपटांतील विनोदी दृष्ये, काही मालिकांमधील दृष्ये, पाच हजारांहून अधिक गाणी असा ऐवज असेल. हॉटस्पॉट तंत्रज्ञानाद्वारे या सर्व साठय़ाचा आस्वाद एसटीतील स्मार्टफोन वापरणारे अनेक प्रवासी एकाच वेळी घेऊ शकतील. तसेच प्रत्येक प्रवाशाला त्याला हव्या त्या गोष्टीचा आस्वाद घेता येणार आहे. या तंत्रज्ञानासाठी कोणत्याही सेवा पुरवठादाराची गरज पडणार नाही. त्यामुळे एसटीला तसा करार करावा लागणार नाही. तसेच ही ‘वाय-फाय’ सुविधा नसल्याने प्रवाशांना एसटी दाखवत असलेले निवडक चित्रपटच बघता येणार आहेत. त्यामुळे सुरक्षा किंवा बीभत्सपणाचा प्रश्नही भेडसावणार नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.