अफवा कुठलीही असू शकते. ती कुठून येते ते समजत नाही. ती ऐकीव असते आणि पसरत जाते. सध्याच्या व्हॉटसअ‍ॅपच्या काळात तर ती अधिक वेगाने पसरते. त्याला बळी पडले की फसगत होतेच. मालाड मध्ये एका अफवेवर विश्वास ठेवल्याने नुसतीच खळबळ उडवली नाही तर, १६ जणांना तुरुंगाची हवा खायला लावली.
नवीनचंद्र मजेठिया आणि मनीष मजेठिया यांची मालाडच्या आक्सा गावात ११४ एकर जमीन आहे. मागील आठवडय़ात त्यांच्या जमिनीबाबत एक विचित्र अफवा या भागात पसरली होती. ‘नवीनचंद मजेठिया यांचे निधन झाले आहे. जमिनीबाबतचा खटला मजेठिया न्यायालयात हरल्याने त्यांचे पुत्र मनीष मजेठिया यांनी ही जागा गरिबांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे’ अशा आशयाची अफवा पसरली.
अफवेचे लोण व्हॉटसअ‍ॅपवरही पसरू लागले. पाहता पाहता मुंबई पाठोपाठ, मालवणी पाठोपाठ, उल्हासनगर, कांदिवली, गोरेगाव, पोयसर या भागांत ही अफवा पसरली आणि लोकांनी अफवा खरी मानून जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी धाव घेतली. मजेठिया यांच्या भूखंडावर  अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली. मजेठिया यांना हा प्रकार समजताच त्यांनी मालवणी पोलिसात तक्रार दिली. तोपर्यंत ४०० जणांनी या जागेवर खुंटी मारून आपला हक्क सांगितला होता. पोलिसांनी या लोकांची समजूत काढून परत पाठवले. पण १६ जण शेवटपर्यंत ठाम होते. अखेर त्यांना पोलिसांनी खासगी मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली. न्यायालयाने नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.
‘ही अफवा कुणी पसरवली त्याचा आम्ही तपास करत आहोत,’ अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली. १९५० साली मजेठिया यांच्या इंडिया फार्मर या कंपनीला ही जमीन सरकारकडून ९९ वर्षांच्या भाडेपट्टीच्या करारावर मिळाली होती. परंतु नुकताच आघाडी सरकारने हा करार मोडीत काढला होता. सरकारच्या या निर्णयाला मजेठिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या अफवा नाटय़ानंतर वादग्रस्त भूखंडावर राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
*‘मालाडमधील मनीष मजेठिया यांनी आपल्या मालकीची ११४ एकर जमीन गरिबांमध्ये मोफत वाटण्याची घोषणा केली आहे’ अशी अफवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पसरली.
*ही अफवा खरी समजून सुमारे ४०० जणांनी संबंधित जमिनीवर अतिक्रमण केले आणि आपापली जागा निश्चित केली.
*मजेठिया यांना ही गोष्ट समजताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण करणाऱ्यांना हुसकावून लावले. मात्र, तरीही जागेवर अडून बसलेल्या १६ जणांना अखेर पोलिसांनी तुरुंगाचा रस्ता दाखवला.