गेल्या नऊ महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. १६ जानेवारीपासून मुंबई महानगरात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आगारप्रमुख, पर्यवेक्षक व चालक-वाहकांना दिले असून तसे परिपत्रकच काढले आहे.

करोनामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागताच लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील सरकारी कर्मचारी, पोलीस, सरकारी व पालिका रुग्णालय व पालिका कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या काही फे ऱ्या चालवण्यात आल्या. यामध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावरच एसटीत प्रवेश देताना फक्त तिकीट दिले जात होते. त्यांच्याकडून तिकिटाची रक्कम मात्र घेण्यात येत नव्हती. ही सवलत देताना तिकिटाची एकूण रक्कम शासनाच्या संबंधित विभागाकडून एसटीला मिळत होती. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा पाहता शनिवारपासून मोफत प्रवासाची सवलत बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.