गरीब-मध्यमवर्गीय वस्त्यांमधील धोकादायक वृक्ष

मुंबई : गरीब अथवा मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमधील धोकादायक अवस्थेतील झाडाच्या फांद्याची छाटणी अथवा ते हटविण्याचे काम मोफत करण्यास पालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे वस्त्यांमधील धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी वा त्याच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी रहिवाशांना शुल्क भरावेच लागणार आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ नुसार नवीन इमारतींना ताबा प्रमाणपत्र देण्यासाठी दर १०० चौरस फूट खुल्या जागेमागे एका वृक्षाची लागवड करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार खासगी वसाहतींमध्ये नागरिक वृक्षांची लागवड आणि त्यांची जोपासना केली जाते. परंतु काही वर्षांनी ही वृक्षसंपदा जीर्ण होते आणि धोकादायक बनते. वेळप्रसंगी हे वृक्ष उन्मळून पडतात. असे धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी वा त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी संबंधितांना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते. तसेच वृक्ष तोडण्यासाठी वा छाटणी करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये शुल्क भरावे लागते.

मुंबईमधील बहुसंख्य गृहनिर्माण संकुलांमध्ये मध्यमवर्गीय वास्तव्यास आहेत. या संकुलांमध्ये मोठय़ा संख्येने वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष छाटणीसाठी येणारा खर्च या सोसायटय़ांना परवडत नाही. यामुळे ही मंडळी धोकादायक वृक्षाकडे काणाडोळा करतात. परिणामी झाड उन्मळून पडते वा फांद्या तुटून दुर्घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन गरीब व मध्यमवर्गीयांच्या लोकवस्त्यांमधील कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या जीर्ण वृक्षांची तोडणी वा छाटणी मोफत करण्याचे धोरण अवलंबवावे, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी ९ ऑक्टोबर २०१८ रोजी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना पालिका सभागृहाने एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविली होती. याबाबतचा प्रशासनाचा अभिप्राय सादर करण्यात आला असून त्यामध्ये या मागणीबाबत नकारघंटा वाजविण्यात आली आहे.

मुंबईमधील मृत वा धोकादायक वृक्षांची कापणी वा छाटणी करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार मृत झाडे कापणे, धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी विभागवार मंजूर झालेले दर आकारण्यात येतात. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांच्या लोकवस्त्यांमधील कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या जीर्ण वृक्षांची तोडणी वा छाटणी मोफत करणे उचित होणार नाही, असे प्रशासनाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दोन ते तीन हजार शुल्क

जीर्ण वृक्षांची तोडणी वा छाटणी मोफत करणे उचित होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केल्याने वृक्ष तोडण्यासाठी वा छाटणी करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये शुल्क भरावे लागते.