मुंबई महानगरपालिकेच्या ७० हजार कोटीं रुपयांच्या ठेवींमधून मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत करोना लसीकरण करावे, अशी मागणी भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
राज्यासह देशातील सर्वाधिक करोना रुग्ण मुंबईत असल्याने विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबईत २०११ च्या जनगणनेनुसार १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सुमारे ५८ लाख ५० हजार नागरिक असून त्यांच्या लसीकरणासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ४५ वर्ष वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी महापालिकेच्या निधीतून लसीकरण करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.