कालपरवापर्यंत कुणाच्याही खिसगणतीत नसलेल्या आणि असुविधांनी गजबजलेल्या कळवा आणि मुंब्रा या मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांना मंगळवारपासून ‘वायफाय’ सुविधेचे कोंदण लाभणार आहे.
या रेल्वे स्थानकाचे फलाट आणि बाहेरील परिसरात ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे इंटरनेटचा वापर करता येणार आहे. या सुविधेचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. वापरकर्त्यांना आपली वैयक्तिक माहिती मोबाइल अथवा लॅपटॉपद्वारे नोंदवावी लागणार आहे. त्यानंतरच या सुविधेचा लाभ त्यांना घेता येऊ शकतो.  
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे वायफायने जोडली गेलेली कळवा आणि मुंब्रा ही देशातील पहिली स्थानके असतील, असा दावा या सेवेचे प्रवर्तक तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
कळवा आणि मुंब्रा या दोन स्थानकांच्या परिसराचा विकास केल्यानंतर या ठिकाणी मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध केली जावी, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
मात्र या दोन स्थानकांसाठी अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मध्यंतरी जाहीर केले होते. हा प्रस्ताव मागे पडताच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड यांनी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही सेवा पुरविण्यासाठी या भागात आवश्यक यंत्रणा उभी करण्यात आली असून त्यासाठी नेमका किती खर्च आला याचा तपशील देण्यात मात्र आव्हाडांनी नकार दिला.
कळवा तसेच मुंब्रा स्थानकातील ‘वायफाय’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना स्वत:ची वैयक्तिक माहिती आधी नोंदवावी लागणार आहे. त्यामध्ये ईमेल आयडी, पासवर्ड, मोबाइल क्रमांक आदीचा समावेश असणार आहे. ही माहिती नोंदविल्यानंतर वापरकर्त्यांस मोबाइलवर एसएमएसद्वारे पासवर्ड मिळणार आहे. त्याद्वारे वापरकर्ता ‘वायफाय’ सुविधेचा वापर करू शकतो.
मुंब्रा आणि कळवा या स्थानकांपोठापाठ ठाणे शहरातील गडकरी रंगायतन, तलावपाळी, काशीनाथ घाणेकर, महापालिका मुख्यालय, खारेगाव, शिमलापार्क आदी परिसरांत येत्या महिनाभरात ‘वायफाय’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.