News Flash

रेल्वेची वायफाय सेवा प्रवाशांसाठी सुसाट

दर आठवडय़ाला पाच लाख नव्या वापरकर्त्यांची भर

रेल्वेची वायफाय सेवा प्रवाशांसाठी सुसाट

दर आठवडय़ाला पाच लाख नव्या वापरकर्त्यांची भर

मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर गेल्या महिन्यापासून उपलब्ध झालेल्या वायफाय सेवेला मुंबईकरांनी महिन्याभराच्या आत पसंती दर्शवली आहे. २२ ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकार्पित झालेली ही सेवा त्याच दिवसापासून प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तेव्हापासून आतापर्यंत दर आठवडय़ाला पाच लाख नव्या वापरकर्त्यांनी या मोफत वायफाय सेवेचा लाभ घेतला आहे. हा प्रतिसाद पाहून आता रेल्वेने लवकरात लवकर आणखी उपनगरीय स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ४०० स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याची घोषणा केली होती. रेलटेल आणि गूगल यांच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या या सेवेची सुरुवात मुंबई सेंट्रल स्थानकापासून झाली. त्यानंतर मुंबईतील आणखी नऊ स्थानकांवर वायफाय सेवेची सुरुवात सुरेश प्रभू यांच्याच हस्ते २२ ऑगस्ट रोजी झाली. ही सेवा सुरू झाल्या दिवसापासूनच उपनगरीय रेल्वे प्रवाशांनी या सेवेचा वापर सुरू केला. त्यासाठी ‘ही सेवा कशी वापरावी’, हे सांगणाऱ्या फलकापुढे गर्दी केलेल्या मुंबईकरांची सवयही प्रवाशांना झाली होती.

आता पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, खार, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, दादर आणि मध्य रेल्वेवरील कल्याण, पनवेल, भायखळा, दादर आणि एलटीटी या स्थानकांवर वायफाय सेवा सुरू झाली आहे. या स्थानकांवर मिळून दर आठवडय़ाला पाच लाख नवीन प्रवासी ही सेवा वापरत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. वायफाय सेवेचा सर्वाधिक वापर मुंबई सेंट्रल येथे होत असून त्याखालोखाल दादर आणि कल्याण या स्थानकांचा क्रमांक येतो.

प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहून आता पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाने आणखी स्थानकांवर वायफाय सेवा देण्यात यावी, असा प्रस्ताव तयार केला आहे. यात अंधेरी, बोरीवली, ठाणे, डोंबिवली आदी महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाकडून या स्थानकांना मान्यता मिळाल्यास लवकरच या स्थानकांवरही वायफाय सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 2:46 am

Web Title: free wifi hotspot at railway station
Next Stories
1 भाजपविरोधी ‘संघा’त शिवसेना
2 ‘रविवार वेळापत्रका’मुळे प्रवाशांचे मंगळवारी हाल
3 कैद्यांना संप करण्याचा अधिकार नाही
Just Now!
X