राममंदिर, काळबादेवी

ब्रिटिश आमदनीमध्ये सात बेटांची मुंबापुरी आकार घेऊ लागली. आतासारख्या सुविधा नसल्या तरीही त्या काळीही मुंबईबद्दल प्रत्येकाच्या मनात आकर्षण होतेच. नोकरी – व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मंडळी मुंबईत दाखल होत होती. पाठारे प्रभू आणि मासेमारी करणारे कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी. कोळी समाज मासेमारी करून आपली उपजीविका करीत होता. तर पाठारे प्रभू समाजातील अनेक दिग्गजांनी व्यापारात जम बसविला होता. आपल्या कर्तुत्वामुळे समाजात मानमरातब मिळविलेले विठोबा कानोजी कोठारे हे त्यापैकीच एक.

ईस्ट इंडिया कंपनीने त्या काळी मुंबईत अनेक वास्तू उभ्या केल्या आणि नको असलेले भूखंड भाडेपट्टय़ावर देण्यास सुरुवात केली होती. पडीक भूखंडाचा विकास होईल आणि अतिक्रमण टळेल हा यामागचा उद्देश होता. त्याकाळी काळबादेवी हा परिसर म्हणजे निसर्गाने बहरलेला अतिशय शांत भाग होता. याच काळबादेवीतील तिलोवाडीतील एक भूखंड विठोबा कानोजी कोठारे यांनी १७९६ साली भाडेपट्टय़ाने घेतला आणि वृक्षवल्लीने नटलेल्या या भूखंडावर आपल्यासाठी टुमदार घर बांधले. विठोबा कानोजी कोठारे देवभक्त. त्यांनी घराजवळच एक छोटेसे मंदिरही बांधले. पण काही वर्षांतच त्यांनी आपला मुक्काम नजीकच्या खत्तरगल्लीत हलवला आणि काळबादेवीत घराचे रूपांतर मंदिरात केले. लाकडी बांधकामाचा उत्तम नमुना ठरेल, अशा पद्धतीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले हेच ते राममंदिर. रामजन्मोत्सवासह बहुतांश सर्वच उत्सव येथे साजरे होत आले. अन्नकोट म्हणजे राममंदिराचे वैशिष्टय़ बनले होते. केवळ अन्नकोट पाहण्यासाठी मंदिरात तोबा गर्दी व्हायची. या राममंदिरामुळेच या परिसराला रामवाडी नाव पडले. पुरातन वारसा वास्तू ठरावी अशी मंदिराची वास्तू. प्रशस्त गाभारा, सभामंडप, लाकडी कठडे असलेली गॅलरी, मंदिरासमोर दगडी दीपमाळ. त्यामुळे हे मंदिर पटकन नजरेत भरायचे. पण गेल्या काही दशकांमध्ये काळबादेवीत दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारतींमध्ये मंदिर हरवून बसले आहे.

या मंदिराकडे क्रांतिकारकांचे देवालय म्हणूनही पाहिले जाते. पुण्यातील प्लेगच्या निवारणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या वॉल्टर चार्ल्स रँड या अधिकाऱ्याची गोळय़ा झाडून हत्या करणाऱ्या दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधूंचा या राममंदिरात नेहमी वावर असे. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव यांचे वडील हरिभाऊ कीर्तनकार होते. चातुर्मासामध्ये नित्यनियमाने हरिभाऊ चाफेकर कीर्तन करायचे. त्या वेळी ते ठाकूरद्वारजवळील कामत चाळीत वास्तव्यास असायचे. कीर्तनकार असले तरी ते समाजसुधारक होते. आपल्या कीर्तनातून जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य ते करीत होते.  हरिभाऊ कीर्तन करायचे आणि दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव त्यांना साथसंगत करायचे. त्यामुळे या तिन्ही भावांचा चातुर्मासात मुंबईतील कामत चाळीत मुक्काम असायचा. पण पुण्यातील जनतेवर सुरू असलेल्या अनन्वित छळामुळे तिन्ही भाऊ संतप्त झाले होते. रँडला धडा शिकवण्याचे त्यांनी मनोमनी पक्के केले होते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरक महोत्सवानिमित्त पुण्यात जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हीच संधी साधून २२ जून १८९७ रोजी पुण्याच्या गणेश खिंडीत रँडला गाठून दामोदर आणि बाळकृष्णने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात आणखी एक इंग्रज अधिकारी मारला गेला.

या घटनेनंतर तडक मुंबईत दाखल झालेले चाफेकर बंधू पुन्हा कीर्तनात वडिलांना साथसंगत करू लागले. कीर्तनाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या चाफेकर बंधूंच्या गुप्त भेटीगाठी घेण्यासाठी अनेक मंडळी रामवाडीतील राममंदिरात येत होती. मंदिर असल्यामुळे या गुप्त गाठीभेटींबद्दल फारसा कुणाला संशय येत नव्हता. त्यामुळे चाफेकर बंधूंचे काम निर्विघ्नपणे सुरू होते. त्यामुळे या राममंदिराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ही ऐतिहासिक घटना विस्मरणात जाऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनाने चाफेकर बंधूंचे स्मारक मंदिरात उभे केले आहे.

केवळ पारतंत्र्य काळातच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातही हे मंदिर चळवळीच्या अग्रभागी होते. पण त्याचा मागमूस कुणालाच लागला नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. विरोधकांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबण्यास सुरुवात झाली. त्यावेळी याच मंदिराने अनेक कार्यकर्त्यांना संरक्षण दिले. आणीबाणीच्या काळात मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखाच चालविण्यात येत होती. अनेक दिग्गज स्वयंसेवकांच्या गुप्त बैठकाही होत होत्या. पण त्याचा मागमूसही कुणाला लागला नाही हे विशेष. आजघडीला उत्सवाच्या निमित्ताने राममंदिर गजबजून जात आहे. केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक भान राखून या मंदिराने पारतंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळात चोख कामगिरी बजावली. म्हणूनच इतर मंदिरांच्या तुलनेत काळबादेवीच्या राममंदिराला वेगळेपण लाभले आहे. त्यामुळे इतिहासातील वाटेकरी म्हणूनच या क्रांतिकारी देवालयाकडे आजही पाहिले जाते.

prasadraokar@gmail.com