मुंबई : करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लागू असलेली टाळेबंदीची मुदत १ जूनपर्यंत वाढविताना परराज्यातून येणाऱ्या माल वाहतूकदारांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करण्याची अट राज्य शासनाने शनिवारी रद्द के ली. धान्य, डाळी, भाजीपाला, फळे, औषधे, प्राणवायू आदी अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदारांचे शरीराचे तापमान आणि अन्य लक्षणे नसल्याची खात्री करून त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल.

परराज्यातून येणाऱ्या माल वाहतूकदारांना राज्याच्या सीमेवर ४८ तासांपूर्वी केलेल्या करोना चाचणीचा अहवाल सादर करणे शनिवारपासून बंधनकारक करण्यात आले. परिणामी पहिल्याच दिवशी राज्याच्या सीमेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परराज्यातून भाजीपाला, डाळी, कडधान्ये, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यातच सध्या प्राणवायूची वाहतूक प्राधान्याने के ली जाते. करोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक के ल्याने परराज्यातून अत्यावश्यक सेवा, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. माल वाहतूकदारांच्या संघटनेनेही राज्य सरकारच्या या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त के ली होती.