नेरूळ येथील एस आय ई एस महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ मास मीडिया अभ्यासक्रमातर्फे ‘फ्रेम्स’ चित्रपट महोत्सव गुरुवार, ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदाचे महोत्सवाचे १० वर्ष आहे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘अटॅक्स ऑफ २६/११’ या चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व ट्रेलर हे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन व्हिडिओ, जाहिराती, लघुपट, संगीत व्हिडिओ दाखविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमधून चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांमध्ये उदयोन्मुख कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक निर्माण व्हावेत या उद्देशाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. विविध महाविद्यालयातील बी. एम. एम. अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महोत्सवासाठी आपली कलाकृती पाठविता येणार आहे.
या महोत्सवात आतापर्यंत अनुराग कश्यप, मधुर भांडारकर, महेश भट आदी दिग्गज दिग्दर्शकांनी हजेरी लावली असून विद्यार्थ्यांशी सिनेमा या विषयावर चर्चा केली आहे. या महोत्सवात प्रवेशिका पाठविण्यासाठी सौरभ भारद्वाज (९८३३६६७८५७), गुंजन चक्रवर्ती (९६९९१८९९३३) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर http://www.framesfilmfestival.com  या महोत्सवाच्या संकेतस्थळाद्वारेही संपर्क साधता येईल.