पालिकेचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई : बेकायदा बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही अभिनेता सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात केला. तसेच सोनूला करवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणीही केली.

पालिकेच्या कारवाईविरोधात सोनूने उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम केलेले नाही, असा दावा त्याने केला आहे. तसेच पालिकेने कारवाईबाबत बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याच्या आरोपांत तथ्य नसल्याचा दावा करणारे तसेच त्याच्याकडून कारवाईनंतरही बेकायदा बांधकाम केले जात असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र पालिकेने मंगळवारी अड. जोएल कार्लस यांच्यामार्फत केले.

त्यानुसार, मंजूर आराखडय़ात विनापरवानगी बदल करून तसेच निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर करून सोनूला त्यातून नफा कमवायचा आहे. त्यामुळेच बेकायदा बांधकामावर दोनवेळा कारवाई केल्यावरही त्याने ते पुन्हा बांधले. तिथे विनापरवाना हॉटेलही सुरू केले. बेकायदा बांधकामाबाबतची त्याची वृत्ती सराईत गुन्हेगारासारखीच आहे,  असा दावा पालिकेने केला आहे. आपण कोणतेही बेकायदा बांधकाम केलेले नाही वा जे काही बदल केले आहेत ते महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन कायद्यानुसार केले आहेत हा सोनूचा दावा बेकायदा बांधकामाचे संरक्षण करण्यासाठी आहे. उलट त्याने मंजूर आराखडय़ाचे उल्लंघन करून काम केले आहे. सोनूला निवासी इमारतीची व्यायावसायिक इमारतीत रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच त्याला हॉटेल चालवण्याचा परवानाही देण्यात आलेला नाही, असा दावासुद्धा पालिकेने केला आहे.

जुहू येथील ज्या शक्तीसागर या निवासी सहा मजली इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले, ती त्याच्या वा त्याची पत्नी सोनालीच्या मालकीची असल्याची कोणतीही कागदपत्रे नाहीत, असेही पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.